मुंबई, दि. 3: सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताब मिळविलेल्या जळगावच्या विजय चौधरी यांना विशेष बाब म्हणून राज्य पोलिस दलात उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौधरी यांना आज नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत जळगावचे कुस्तीपटू विजय केसरी यांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकावला होता. ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला पोलीस दलात नोकरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ‘‘महाराष्ट्रात कुस्तीला प्राधान्य देऊन खेळाडूंना जी काही मदत लागेल, ती राज्य सरकार करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्ती करीत राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयानुसार चौधरी यांना राज्य पोलिस दलात उपअधीक्षक पदावर विशेष बाब म्हणून नियुक्ती देली आहे. वर्षा निवासस्थानी चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी चौधरी यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.