जगाला युद्ध नको बुद्ध हवा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जगाला युद्ध नको बुद्ध हवा - मुख्यमंत्री

Share This

मुंबई, दि. 10 : तलवारीने जग जिंकणारा कोणीच जग जिंकू शकला नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्चित जिंकता येते. तथागत गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्यकता असून जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित विश्वशांती परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्‍यमंत्री बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अमर साबळे, अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, आशिष शेलार, डॉ.मिलिंद माने, संजय शिरसाठ, श्रीलंकाच्या राजदूत सरोजा सिरीसेना, थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त पीयुष सिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, 26 नोव्हेंबरला हॉटेल ताजमहाल वर झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये हिंसेने विजय मिळविण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच हॉटेल ताजसमोर गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने विश्व शांती परिषदेच्या माध्यमातून आज शांतीचा संदेश दिला जात आहे, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगिकार सर्वांनीच करणे आज पुन्हा एकदा काळाची गरज आहे. जपान मधील नागरिकांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा स्वीकार केल्यानंतरच जपानची प्रगती झाली असून चीनमधील ड्युनहाँग बौद्ध लेण्या महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आल्या असल्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला.

श्री.फडणवीस म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या विचारांचा अंगिकार करून देशाचे संविधान तयार केले. त्यांचे विचार जगाला दिशा देणारे आहेत. ते जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. 21 व्या शतकात डिजीटल चलनाला महत्त्व असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भीम ॲप आणि भीम आधारच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिली आहे. आपले सरकार समतेचे राज्य स्थापित करण्यास कटिबद्ध असून गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरूनच यापुढेही काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक न्याय मंत्री श्री.बडोले यांनी भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचे जतन व्हावे, हा या परिषदेचा उद्देश असल्याचे यावेळी सांगितले.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धांचा प्रज्ञा, शील, करूणा या विचारांचा स्वीकार केला. समतेवर आधारित संविधान हे त्याच विचारांवर आधारलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.रिजीजू यांनी गौतम बुद्धांचा शांतीचा संदेश जगाला मार्गदर्शन करणारा विचार असून भारत हाच संदेश जगाला देत आला असल्याचे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच सर्वांना समानतेने राहणे शक्य असल्याचे ते म्हणाले.

श्री.दिलीप कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी पाठीशी घेऊन अनेकांनी मार्गक्रमण केले असल्याचे सांगून गौतम बुद्धांच्या विचारांची आजही गरज असल्याचे नमूद केले. हाच विचार जगभर पोहोचविण्यासाठी या विश्व शांती परिषदेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार अरविंद सावंत, अमर साबळे, श्रीलंकाच्या राजदूत श्रीमती सरोजा सिरीसेना, थायलंडचे राजदूत एकापोल पोलपीपट यांनीही आपले विचार व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविकाद्वारे परिषदेचा उद्देश स्पष्ट केला.

बौद्ध भिक्खुंना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात चिवरदान प्रदान करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages