![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7jo5ADV0Q1Q21GTNRR5XgSFjr1FSPYytbl34TaYOdKs5Mea5lbwlgC2EWHeS11AuponSdqgorapa0TPm5ul7oyWbvKW0VhEhZlSDJhWUkMApcVnlLtiGcRKq7yseVC_57oaY5SQts6uU/s640/Badole.jpg)
मुंबई, दि. 8 : तथागत भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती गेट वे ऑफ इंडिया येथे 10 मे रोजी साजरी करण्यात येत असून जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी एका प्रसिध्दी पत्राद्वारे केले आहे.
संयुक्त जयंती निमित्त विश्वशांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून बौध्द बहुसंख्य 17 देशांच्या राजदूतांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत, विश्वशांती परिषदेचे अध्यक्ष असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेचे उद्घाटक असतील, अशी माहिती बडोले यांनी दिली आहे.
श्रीलंकेचे राजदूत श्रीमती सरोजा सिरीसेना तसेच थायलंडचे राजदूत एकापोल पोलपिपट भारतासोबतचे सांस्कृतिक सहकार्य वृध्दींगत करण्यासंबंधी मांडणी करणार आहेत. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, राहूल नार्वेकर यांच्यासह विविध आमदार विश्वशांती परिषदेस उपस्थित राहणार असल्याचे बडोले यांनी सांगितले आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता काळाघोडा ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावर निघणाऱ्या विश्वशांती रथयात्रेमध्ये जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करून कुटूंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि ही परिषद अविस्मरणीय करावी, असे आवाहनही बडोले यांनी केले आहे.