मुंबई / प्रतिनिधी - परभणी येथील पूर्णामध्ये 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याचे सोडून पोलिसांनी भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले. तसेच लातूर औसा येथील बौद्धांनी आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून मारहाण करण्यात आली आहे. पूर्णा आणि औसा भीमजयंतीवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा, भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, औसातील मोगरगा गावातील बहिष्कार टाकणारे विरोधाकांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी आणि पूर्णा व औसा येथील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी (८ मे) मुंबईच्या आझाद मैदानात आंबेडकरी अनुयायानी निदर्शने केली.
यावेळी मुख्यमंत्री आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेल्याने तसेच मंत्रालयात संबंधित कोणतेही मंत्री उपस्थित नसल्याने निदर्शन करणाऱ्या अनुयायाना कोणाचीही भेट घेता आलेली नाही. यामुळे सरकारचा निषेध करत मुंबईतील आंबेडकरी वस्त्यांमध्ये सरकारविरोधात निषेध मोर्चे काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी बडोले अपयशी ठरले आहेत. यामुळे सामाजिक राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचा निषेध करण्यात आला. बुध्द जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकुमार बडोले यांना किंवा इतर मंत्र्याना कार्यक्रमाला बोलावू नये असे आवाहन करण्यात आले. पिडीतांना न्याय मिळवून देण्यास राज्य सरकार पायाशी ठरल्याने मुंबईत राज्य स्थरीय परिषद आयोजित करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात भिक्खू पययानंद, रिपब्लिकन सेनेचे काशिनाथ निकाळजे, रिपब्लीक पक्षाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड अशोक कांबळे, विवेक कांबळे, महादू पवार तसेच पिडीत भीमसैनिक उपस्थित होते.