मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाण यांच्या सिमांकनासाठी गठीत केलेली कमिटी येत्या चार महिन्यांत सर्वेक्षण करून त्याचा ड्राफ्ट सुचना व हरकतीसाठी जाहीर करेल अशी ग्वाही आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे लाखो मुळ मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आज गावठाण पंचायत आणि कोळीवाडा कृती समितीच्या पदाधिकार्यांनी महसुल मंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. हा विषय गेली अनेक वर्षे आमदार आशिष शेलार मांडत असून नुकत्याच पारपडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा विषय मांडला होता. आज पुन्हा त्यावर बैठक घेण्यात आली.मुंबईचे मुळ रहिवाशी असणारे कोळीवाडे आणि गावठाणांतील रहिवाशी आजही विकासापासून वंचित आहेत. त्यांना पुर्नविकासाच्या योजना आणि एफएसआयचे फायदे मिळण्यासाठी त्यांचे सिमांकन होणे आवश्यक असून गेली अनेक वर्षे सिमांकन करण्याचा विषय प्रलंबित आहे. सिमांकन न झाल्यामुळे अतिक्रमणे वाढत गेली व कोळीवाडे उध्वस्त होण्याची वेळ आली. मात्र भाजपा सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर यासाठी कमिटी गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या कमिटीच्या अहवालानंतर डिसीआर मधे बदल करण्यात येणार आहे.आज याबाबत महसुल मंत्र्यांकडे बैठक घेण्यात आली यामधे कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. येत्या चार महिन्यात सर्वेक्षण करून तो ड्राफ्ट सुचना वे हरकतीसाठी जाहीर करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.