मुंबई, दि. २ : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वच स्पर्धांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन देशाला नावलौकिक मिळवून द्यावा, असे आवाहन राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या वतीने आयोजित वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, कुपरेज मैदानावरील ‘ओरजा-२०१७’ फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राव बोलत होते. या कार्यक्रमास राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार तसेच अर्जुन पुरस्काराच्या मानकरी अंजली भागवत, अभिनेते फरहान अख्तर,नवाजुद्दीन सिध्दीकी, सीआयएसएफचे महानिरीक्षक सतीश खंदारे उपस्थित होते.
राव म्हणाले, देशातील खेळाडूंनी क्रिकेट या खेळापुरतेच मर्यादित न राहता सर्वच खेळांमध्ये प्राविण्य मिळवावे. खेळाडू फुटबॉल खेळापासून उपेक्षित आहे. फुटबॉल खेळाडूंमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच या खेळात अधिकाधिक खेळाडूंचा समावेश व्हावा यासाठी सीआयएसएफने आयोजित केलेली स्पर्धा अभिनंदनीय आहे. खेळाडूंना असेच प्रोत्साहन दिले तर 2017 च्या फुटबॉल विश्वचषकात भारत नक्कीच विजेता ठरेल, अशी आशा व्यक्त करुन राव यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.