मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत दूषित पाण्यामुळे मुंबईकरांना अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याच प्रमाणे मुंबईमध्ये स्वाईनफ्लूचे रुग्णही आढळले आहेत.सन २०१७ मध्ये आतापर्यंत मुंबईत स्वाईनफ्लूचे २१ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका दिड वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत साथीचे आजार वाढले असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच स्वाईनफ्लू ची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी केले आहे.
मुंबईमध्ये सन २०१६ मध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान ३५०० ग्यास्ट्रो / अतिसाराचे रुग्ण आढळले होते. यावर्षी याच कालावधीत २८५० ग्यास्ट्रो / अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पाण्यामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत सध्या गरमी असल्याने नागरिक भेटेल तिथे पाणी पितात, त्यातच बर्फाचे थंड पाणी पिण्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो. सर्वच ठिकाणी पाणी चांगले असतेच असे नसल्याने ग्यास्ट्रो / अतिसाराची लागण होत आहे. मुंबईमध्ये ७४ टक्के बर्फाचे नमुने योग्य नसल्याचे चाचणीमधून उघड झाले आहे. हॉटेलमधील ०.४ टक्के तर फेरीवाल्यांकडील १० टक्के पाणी दूषित असल्याचे चाचणीमधून समोर आले आहे. यामुळे घराबाहेर पाणी पिण्याचे टाळावे, जमल्यास घरातून पाण्याची बाटली सोबत न्यावी असे आवाहन केसकर यांनी केले. मुंबईमधील दूषित बर्फ़ाबाबत एफडीएकडे पालिकेने तक्रार केली असून एफडीए कडून त्यावर कारवाई केली जाईल असे केसकर यांनी सांगितले.