लोंकाच्या कमी उपस्थतीमुळे उपोषण सुरु
मुंबई (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात आला मात्र या मोर्चाला शंभर लोकही जमले नसल्याने मोर्चाचा फज्जा उडाला. मराठा महामोर्चा गुंडाळून कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजात सरकार फूट पाडत असून आमची लोकही फितूर झाले आहेत असा आरोप मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक संभाजी पाटील यांनी यावेळी केला. राज्यभर लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चाचे निघाल्यावर आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने अखेरचा महामोर्चा मुंबईत काढला जाणार होता. त्यासाठी मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आझाद मैदानात मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. मात्र मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात अवघे १०० लोकच जमले होते. राज्यभरात मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले असताना, अवघे १०० ते १५० लोकांसह मंत्रालयावर मोर्चा काढायचा कसा असा पेच आयोजकांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे हा महामोर्चा रद्द करून, आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले.
मोर्चा आझाद मैदानात अनेकांनी भाषणे केली. एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आझाद मैदानात संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली केदार कदम, सुभाष जाधव, अविनाश पवार, बन्सी डोके, दत्तात्रय सूर्यवंशी, सतीश शिंदे, श्याम आवारे यांच्या सह अनेकजण उपोषणास बसले आहेत. मराठा मोर्चात लाखो लोक आझाद मैदानात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. आम्ही मोर्चा रद्द केला नाही. पोलीस आम्हाला बाहेर जाऊ देत नाहीत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार आहे.
कोपर्डी प्रकरणाचा निषेध करत औरंगाबादमधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाची तारीख नेहमीच बदलत गेली होती. त्यामुळे मुंबईतील मोर्चाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. काही दिवसांपूर्वीच शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी क्रांती दिनाचं औचित्य साधत 9 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र त्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक संभाजी पाटील यांनी मंगळवारी मोर्चा काढला. त्यामुळे मराठा समाजात फूट पडल्याचे बोलले जात आहे.