काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निरुपम यांना आपत्कालीन विभागात नो इंट्री - स्थायी समिती सभा तहकूब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2017

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निरुपम यांना आपत्कालीन विभागात नो इंट्री - स्थायी समिती सभा तहकूब


मुंबई / प्रतिनिधी - 
मुंबईत नालेसफाई योग्य रित्या झाली नसल्याने या वर्षी मुंबई तुंबणार असल्याने महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने काय तयारी केली याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जाण्यापासून पालिका प्राशासनाने रोखले. याचा निषेध करत काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी प्रशासनाचा निषेध करत स्थायी समिती सभा तहकूब करण्याची मागणी केली. रवी राजा यांच्या मागणीला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने स्थायी समिती तहकूब करण्यात आली.


सोमवारी २९ मे रोजी मुंबईतील नालेसफाईची पाहणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा व नगरसेवक सोबत होते. यावेळी केलेल्या पाहणीत मुंबईतील नालेसफाई झाली नसल्याचे निरुपम यांनी निदर्शनास आणले. नालेसफाई योग्य रित्या होत नसल्याने यावर्षी मुंबई तुंबणार असा दावा निरुपम यांनी केला. मुंबई तुंबणार असताना मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने काय करावी केली आहे याची माहिती घेण्यासाठी निरुपम आपल्या पक्षाच्या नगरसेवक विरोधी पक्ष नेत्यांसह गेले असता आपात्कालीन व्यवस्थावपन विभागाच्या आता प्रवेश करण्यास निरुपम यांना परवानगी नाकारण्यात आली. पालिका प्रशासनाच्या उदासीन वृत्तीचा व निष्क्रियतेचा तीव्र निषेध करत रवी राजा यांनी स्थायी समिती सभा तहकूब करण्याची मागणी केली. यावेळी रवी राजा यांनी आता पर्यंत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने कोणत्या नेत्यांना प्रवेश दिला आहे? आपत्कालीन व्यवस्थापन विभागात प्रवेश कोणी करावा कोणी करू नये याची नियमावली बनवली असल्यास स्थायी समिती समोर सादर करण्याची मागणी रवी राजा यांनी केली.

रवी राजा यांच्या मागणीला शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी पाठिंबा देताना रवी राजा यांच्या भावनांशी सहमत असल्याचे सांगितले. इतर पक्षातील कोणत्या नेत्यांना आपातकालीन विभागात प्रवेश देण्यात आला आहे का ? यासाठी काही मार्गदर्शक अशी काही तत्वे आहेत का ? याची माहिती जाधव यांनी सादर करण्यास सांगितली. भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी नालेसफाई होत नाही हे आम्ही वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. मुदतीत नालेसफाई होत नसून गाळ कुठे टाकलं जात आहे याचा रोकोर्ड ठेवलं जात नाही. पक्षाच्या नेत्यांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जाण्यापासून का रोखले याचा खुलासा करावा अशी मागणी केली. समाजवादी पक्षाचे गटनेते राईस शेख यांनीही नालेसफाई होत नसल्याचे सांगून एका पक्षाच्या अध्यक्षांना आपत्कालीन विभागात जाण्यापासून का रोखले असा प्रश्न उपस्थित केला.

राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव यांनी नालेसफाईची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. नाले साफ होत आहेत कि नाही याची पाहणी प्रशासनाने करायला हवी असे सांगत नालेसफाई बाबत प्रशासन नक्कीच गंभीर आहे का ? पक्षाच्या नेत्यांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागात जाण्यापासून रोखण्याची परिस्थिती का निर्माण झाली ? अन्य पक्षाचे नेते या विभागात गेले तेव्हा त्यांना का रोखले नाही ? राजकीय पक्षांच्या नेत्यांना वेगवेगळे न्याय का लावले जात आहेत ? असे प्रश्न उपस्थित करत सभातहकुबीला पाठिंबा दिला.

यावर पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी हा विभाग संवेदनशील आहे. या विभागातून तीन हजार सीसीटीव्हीचे नियंत्रण केले जाते. प्रोटोकॉल पाळणे गरजेचे असल्याने या विभागात जाण्यापासून नगरसेवकांना रोखलेले नाही. पण त्यांच्यासह असलेल्या इतर लोकांना प्रवेश देण्यात आला नसल्याचे सांगितले.तसेच या विभागात आता पर्यंत कोणाला प्रवेश देण्यात आला याची माहिती पुढील बैठकीत सादर करू असे कुंदन यांनी सांगितले. यावर सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी आपत्कालीन विभागात जाण्यासाठी नियमावली काय आहे? फक्त नगरसेवकांना परवानगी आहे का ? मग इतर नेते विभागात कसे जातात ? असे प्रश्न उपस्थित केले. तर सभा तहकुब करण्याची मागणी रवी राजा यांनी केली. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी सदस्यांच्या मागणीनुसार सभा तहकूब केली.

आपत्कालिन कक्षात मॅच आणि मालिकाचे दर्शन - आपत्कालिन कक्ष हा संवेदनशील असल्याचे प्रशासनान म्हणत असताना कॉंग्रेसचे असिफ झकेरिया यांनी या कक्षात क्रिकेटचे सामने आणि मालिकांचे दर्शन होत असल्याची बाब समितीच्या निदर्शनास आणली. असे असेल तर या कक्षात जाण्यास मज्जाव का असा सवाल त्यांनी केला.

Post Bottom Ad