मुंबई - मुंबई महानगर पालिकेने नागरिकांकडून कर रूपाने जमा केलेले ६१ हजार कोटी रुपये विविध बँकांमध्ये ठेवी म्हणून ठेवले आहे. इतकी मोठी रक्कम विविध बँकांमध्ये जमा करून ठेवण्यात मुंबई महापालिकेचा हात कोणीही धरू शकत नाही. असे असतानाही केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महानगरपालिका नापास झाली आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयामार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराने आठवा क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत, महापालिकेने स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम सुरू केले. स्वच्छतेच्या अजेंड्यावर मुंबई हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले. या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियानेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचा दौरा केला. त्यावेळीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने स्वच्छतेचे दर्शन या पथकाला घडवले. ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी विभागात नियमित फेरफटका मारून स्वच्छतेची खातरजमा करण्याची ताकीदही प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना दिली होती. तसेच स्वच्छतेचा दूत म्हणून प्रसिद्ध अभिनेता सलमान खानलाही या मोहिमेत उतरवण्यात आले. काही दिवसांतच मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे महापालिका प्रशासन घाईघाईने जाहीर करून मोकळे झाले. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांचा अभाव असल्याने आजही मुंबईत काही भागांमध्ये उघड्यावर प्रात:विधी उरकणारे दिसून येत आहेत. त्याचबरोबर ओला व सुका कचरा मोहिमेकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ, कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची मंदगती, देवनार कचराभूमीवर सतत लागणाऱ्या आगी आणि नालेसफाई मोहिमेचे तीन-तेरा यामुळे स्वच्छतेत महापालिकेची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर २९व्या क्रमांकावर पोहोचले आहे. त्याचवेळी मुंबईच्या तुलनेत छोटेसे शहर असलेले नवी मुंबई गतवर्षीच्या १२व्या क्रमांकावरून थेट आठव्या क्रमांकावर पोहोचले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेने मुंबई शहराचा जागतिक दर्जा टिकवण्यासाठी स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. यासाठी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूदही वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयोग फेल जात असल्याने मुंबईची कचराकुंडी झाली आहे. या मोहिमांमध्ये नागरी सहभाग मिळवण्यातही पालिकेच्या पदरात अपयशच पडले आहे. परिणामी, केंद्राच्या परीक्षेत मुंबई महापालिकेची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक गुण जास्तच असल्याने यास महापालिकेची पीछेहाट म्हणता येणार नाही, असे हास्यास्पद स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. त्याही पुढे जात मोठ्या शहरांमध्ये मुंबईच अव्वल असल्याचा दावा पालिकेने केला आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत १५३४ गुण मिळवणाऱ्या महापालिकेने प्रगती करीत १५३५ गुण मिळवले असल्याचे जाहीर करीत, आपली पाठही पालिकेने थोपटून घेतली. त्याहून कहर करीत नागरिकांनी प्रतिसाद कमी दिल्याने हा क्रमांक घसरला, असा दावा प्रशासनाने केला आहे. आॅनलाइन प्रतिसादावरही पालिकेने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनाच एकप्रकारे दोषी ठरवले आहे. मोबाइल शौचालय, सार्वजनिक शौचालयात स्वच्छता, बेकायदा होर्डिंग काढणे, रात्रीची सफाई असे प्रयत्न वर्षभर करूनही पाच हजार नागरिकांनी या सर्वेक्षणात आपले मत नोंदवले. यात आॅनलाइनचा सहभाग केवळ पाचशे मतांचा होता, अशी सारवासारवही प्रशासन करीत आहे.