पनवेल (प्रतिनिधी) भाजप सरकार संविधान बदलणार अशा खोट्या आरोळ्या विरोधक देत असतात.मग मी कशाला तिथे आहे ? डॉ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश आहे.जो देशाला तोडेल त्याला मी फोडेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली असून वाट्टेल ते झाले तरी मी समाजाला न्याय देणार. भाजपने अनेक राज्ये पादाक्रांत केली मग पनवेलमध्ये काय अवघड आहे ?त्यामुळे पनवेल मनपात भाजप आरपीआयचाच झेंडा फडकवायचाय असे ठोस प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खारघर येथे केले आहे. प्रीती ठोकळे यांनी आयोजित केलेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भाजप सरकारच्या नोटाबंदीचे समर्थन करीत 'जेंव्हा क्रांती होते तेंव्हा त्रास होतोच' असेही ते यावेळी म्हणाले.
बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्राध्यापिका प्रीती मिलिंद ठोकळे यांच्या पुढाकाराने सोमवारी (दिनांक ३० एप्रिल) छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी ना. रामदास आठवले यांनी आपल्या कधी काव्यमय विनोदी शैलीत तर कधी गंभीर होत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ते म्हणाले कि,पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार असा प्रचार वारंवार विरोधक करीत असतात. मात्र पंतप्रधान नेहमी सांगतात कि, डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर एक चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला नसता. आरक्षण हे गरजेचेच आहे असेही पंतप्रधान सांगत असतात असेही ते यावेळी म्हणाले. डॉ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश आहे.जो देशाला तोडेल त्याला मी फोडेन असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी दिली असून वाट्टेल ते झाले तरी मी समाजाला न्याय देणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. भाजप सरकारच्या नोटाबंदीचे जोरदार समर्थन ना. आठवले यांनी करताना सांगितले कि जेंव्हा क्रांती होते तेंव्हा त्रास होतोच. याचा अर्थ एटीएमच्या लाईन मध्ये उभ्या असलेल्या जनतेला त्रास व्हावा असे नाही तर जर जर सर्वाना सांगून हा निर्णय घेतला असता तर काय झाले असते ते सर्वाना माहित आहेच. त्यामुळे केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला तो योग्यच होता, असेही त्यांनी सांगितले. भीम ऍप ची नवी संकल्पना केंद्र सरकारने सुरु केली असून तिचाही लाभ घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या संयुक्त जयंती महोत्सवास शुभेच्छा देताना सांगितले कि,गोर गरीब जनतेला व्यासपीठ मिळवून देण्याचे महान काम महापुरुषांनी केले आहे. डॉ बाबासाहेबानी घटना तयार करून सर्वाना योग्य संधी देण्याचे महान कार्य केले आहे त्याला तोड नाही. त्यामुळे महापुरुषांच्या जयंत्या वर्षभर साजऱ्या होत असतात याचा अभिमान आहे.
या कार्यक्रमाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, भाजप ज्येष्ठ नेते अभिमन्यू शेठ पाटील, शंकर ठाकूर, अनंता तोडेकर, निलेश बाविस्कर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, सरचिटणीस बिना गोगरी, कीर्ती नवघरे, किरण पाटील, समीर कदम, नेत्रा पाटील, सुलभा पालेकर, दीक्षा जगताप, बालेश भोजने, अमर उपाध्याय, भीमराव लोंढे, अनिल साबणे, रामचंद्र पाटील, अमोल मुके, प्रफुल्ल कांबळे, शशिकांत देशमुख, बंडू मोहिते यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभी करायला घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विश्वगुरू,महासत्ता भारत बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाराष्ट घडवाचाय. त्यासाठी विकासाची योग्य दिशा योग्य नेतृत्व अशी सांगड घालत येत्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा. महापुरुषांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र भाजपला घडवायचाय. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे तीच कास खारघरवासीय निवडतील अशी मला खात्री आहे.
--- आ. प्रशांत ठाकूर
भाजप रायगड जिल्हाध्यक्ष