मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या राणीबागेत शुल्क वाढीवरून सुरु झालेले राजकारण काही केल्या कमी होताना दिसत नाही. राणीबागेतील शुल्क वाढीच्या प्रस्तावाला भाजपा आणि विरोधी पक्षाने विरोध केला असताना सत्ताधारी शिवसेनेने राणीबागेतील प्रवेश शुल्क अर्ध्याने कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक मोकळा स्वास घेण्यासाठी येतात अश्या नागरिकांसाठी पालिकेने कोणत्याही वेगळ्या सोयी सुविधा दिल्या नसताना वेगळे शुल्क आकारू नये असे आवाहन भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत राणीबाग प्रवेश शुल्काच्या प्रस्तावाला जोरदार विरोध करू असे सांगितले आहे.
महापालिकेच्या भायखळा राणीबाग मध्ये हम्बोल्ट पेंग्विन कक्ष सुरु करण्यात आले. राणीबागेत लहान मुलांसाठी २ रुपये तर प्रौढांसाठी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. या शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. यानुसार एकाच कुटुंबातील आई वडील आणि दोन मुलांना १०० रुपये, एका कुटुंबा व्यतिरिक्त एखादा लहान मुलगा किंवा मुलगी असल्यास प्रत्येकी २५ रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जाणार आहे. तसेच मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लोकांकडून उद्यान प्रशासन दरमहा ३० रुपये शुल्क घेते या पासच्या दरात ५ पटीने वाढ करून १५० रुपये दरमहा शुल्क घेतले जाणार आहे. गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच हा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीत मंजूर करण्यात आला आहे. सादर प्रस्ताव स्थायी समिती समोर आला असता याला भाजपा आणि काँग्रेस सह विरोधी पक्षांचा विरोध असल्याने हि दरवाढ अर्ध्याने कमी करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना तयार झाली आहे. यासाठी राजकीय पक्षांनी स्थायी समितीत चर्चा करून दार काय असावेत हे ठरावावेत अशी भूमिका सेनेने घेतली आहे.
मुंबईमधील मोकळ्या जागा ताब्यात घेण्यासाठी महापौर उत्सुक नाहीत. शिक्षण संस्थांना दिलेले भूखंडही पालिका परत घेण्याच्या नोटीस देत आहे. एकीकडे पालिका मोकळे भूखंड ताब्यात घेत नसताना भायखळा परिसरातील नागरिकांसाठी असलेल्या राणीबागेत जाण्यासाठी महापालिका शुल्क घेणार आहे. मुंबईकर नागरीकांच्या करामधून राणीबाग शुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या पैशांमधूनच पेंग्विन कक्ष बनवण्यात आला आहे. नागरिकांनी दिलेल्या करामधून राणीबाग व पेंग्विन कक्षाचे महिन्याचे सव्वा कोटी रुपये वीज बिल भरले जात आहे. असे असताना या परिसरातील नागरिक राणीबागेत मोकळा श्वास घेण्यासाठी येत असल्याने त्यांच्यावर विनाकारण भुर्दंड का लावावा ? या नागरिकांनी मोकळा श्वास घेण्यासाठी जायचे कोठे असा प्रश्न कोटक यांनी उपस्थित केला आहे. महानगर पालिकेने मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही नव्या सोयी सुविधा दिल्या नसताना त्यांच्यावर शुल्क लावणे कितपत योग्य आहे याचा सर्व राजकीय पक्षांनी विचार करावा असे आवाहन कोटक यांनी केले आहे.