मुंबईतील रस्त्यांच्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती कामांचा प्रस्ताव शुक्रवारी समितीच्या मंजूरीसाठी पटलावर आला होता. दादर पूर्व व पश्चिम विभागातील एकूण १९ रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रस्तावावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी हरकत घेवून विभागातील रस्त्यांच्या समस्येचा पाठा वाचला. मागील सहा महिन्यापासून बहुतांश रस्ते खोदले आहेत. त्यांची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्ती करण्याएेवजी चांगले रस्ते खोदण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्यास पावसाळ्यात त्याचा फटका सर्वसामन्य मुंबईकरांना बसेल. परिणामी नगरसेवकांना दोषी ठरवले जाईल, असा मुद्दा शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल व मंगेश सातमकर, कॉंग्रेसचे पालिका गटनेते रवी राजा, सपाचे रईस शेख आदी नगरसेवकांनी मांडला. पालिकेने रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत ३१ मे रोजी संपणार आहे. तीनशेहून अधिक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. येत्या पाच दिवसात ही कामे पूर्ण होतील का, असा प्रश्न यावेळी उपस्थितीत करण्यात आला.
दरम्यान, रस्ते दुरुस्ती करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांची पालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त पहाणी करत आहेत. मुदतीत ही कामे पूर्ण होतील, असे आश्वासन पालिका अतिरिक्त आयुक्त आय. एन. कुंदन यांनी दिले.