भायखळा येथील विरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विन पाहणे व मॉर्निंग वॉक करणे नागरिकांना आता महाग होणार आहे. भाजपा आणि समाजवादी पक्षाने केलेल्या विरोधानंतरही सत्ताधारी शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने एका व्यक्तीला लागणारे १०० रुपयांचे शुल्क ५० रुपये करण्याच्या उपसुचनेसह प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. प्रस्तावावर सदस्यांना बोलण्यास दिले जात नाही असे कारण देत भाजप व सपाने सभात्याग केला. दरम्यान या प्रस्तावाला सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर शुल्कवाढीची अमलबजावणी होईल. तोपर्यंत तरी नागरिकांना आणि लहान मुलांना पेंग्विन दर्शन पाच व दोन रुपयात होणार आहे.
आता पर्यंत मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते. पेंग्विन आणल्यानंतर राणी बागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र या प्रस्तावाला सर्वच स्तरातून विरोध सुरू केला. याचा फायदा उठवत भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. भाजपाचे संख्याबळ समान असल्याने हा प्रस्ताव फेटाळला गेल्यास नाचक्की होईल, याची शिवसेनेला धास्ती वाटू लागली. त्यामुळे दरवाढीवर फेरविचार करण्यास शिवसेनेने सुरुवात केली.
त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव आज आला असता शिवसेनेने दर कमी करण्याची उपसुचना मांडली. त्याप्रमाणे प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये दर ५० वर आणण्यात आले. मात्र कुटुंबासाठी प्रवेश दर व राणी बागेत मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांकरीता सुचवण्यात आलेले प्रवेश शुल्क तेवढेच ठेवण्यात आले. राणी बागेचे काम अद्याप अर्धवट असताना ही दरवाढ योग्य नाही, सुविधा देत नाही तर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना शुल्क का? असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. समाजवादीने हा प्रस्ताव परत पाठवून द्या, अशी सुचना केली. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने समर्थन दिले. यामुळे बळ मिळालेल्या शिवसेनेने या विषयावर मतदान घेऊन बहुमताने प्रस्ताव मंजूर केला.
भाजपा समाजवादीचा सभात्याग -राणीबागेच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या तसेच बाजार व उद्यान समतीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भाजपचा विरोध सुरु झाल्याने स्थायी समितीमध्ये वादळी चर्चेचे संकेत होते. मात्र शिवसेनेनेच्या खेळीमुळे भाजपाला हा प्रस्ताव रोखता आला नाही. उपसूचना मांडून हा प्रस्ताव लटकावण्याचेही भाजपाला सुचले नाही. त्यामुळे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजप आणि समाजवादी पक्षाने सभात्याग करून समाधान मानले.
शुल्कवाढ -
- राणीबाग प्रवेश व पेंग्विन दर्शनासाठी एकत्रित शुल्क
- १२ वर्षांवरील व्यक्तींसाठी : ५० रुपये
- तीन ते १२ वयोगटांतील मुलांसाठी : २५ रुपये
- कुटुंबासाठी : दोन प्रौढ व तीन ते १२ वर्षांपर्यंतची दोन मुले : १00 रुपये
शालेय विद्यार्थ्यांसाठी -पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : निशुल्क.
खासगी शाळांतील १२ वर्षांवरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी : २५ रुपये.
सकाळी सहा ते आठपर्यंत मॉर्निंगवॉकसाठी : मासिक १५0 रुपये.
संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत फेरफटका बंद
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी : निशुल्क
फोटोग्राफी पेंग्विन कक्ष वगळता : १00 रुपये
व्हिडीओ शूटिंग पेंग्विन कक्ष वगळता : ३00 रुपये
परदेशी पर्यटकांसाठी -१२ वर्षांवरील व्यक्तीसाठी : ४00 रुपये.
तीन ते १२ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी : २00 रुपये.