मुंबई / प्रतिनिधी -
महापालिकेच्या कीटकनाशक विभागाद्वारे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या रोगांच्या प्रसारास कारणीभूत उंदीर व घुशींचेही नियंत्रण केले जाते. उंदराच्या एका जोडीपासून वर्षभरात १५ हजारांचा कुटुंब कबिला तयार होत असल्याने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने 'मूषक नियंत्रण' हे एक मोठे आव्हान आहे. यादृष्टीने महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न नियमितपणे करीत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून जानेवारी ते एप्रिल २०१७ या ४ महिन्यांच्या कालावधीत ८१ हजार ५० उंदरांचे नियंत्रण करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.सस्तन प्राण्यामध्ये मोडणाऱ्या उंदीर वा घुशी यांचे आयुर्मान साधारणपणे १८ महिन्याचे असते. गर्भधारणेनंतर साधारणपणे २१ ते २२ दिवसांत मादी उंदीर आपल्या पिल्लांना प्रत्यक्षपणे जन्म देते. एका वेळेस साधारणपणे ५ ते १४ पिल्लांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिल्ले ५ आठवडयात प्रजननक्षम होऊन ते देखील नव्या पिल्लांना जन्म देतात. ज्यामुळे उंदरांचे प्रजनन अनेक पटीत होते. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे अंदाजे १५ हजारपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.
उंदीर वा घुशींमुळे उद्भवणाऱ्या रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसिस या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘झिनॉपसिला चिओपिस’(Xenopsylla cheopis) या पिसवा उंदीर - घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते. तरलेप्टोस्पायरोसिस जिवाणू अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्याच्या मुत्राव्दारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात. या चतुष्पाद प्राण्यांमध्ये उंदरांचाही समावेश होतो.लेप्टोस्पायरोसिसने बाधित असलेल्या प्राण्याचे मलमूत्र, माती, पाणी,अन्न, पेयजले इत्यादींच्या संपर्कात माणूस आल्यास जखमेव्दारे अथवा तोंडाव्दारे लेप्टोस्पायरोसीसचे जिवाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात.
लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने मुंबईत ज्या ठिकाणावर पावसाळयात पूर परिस्थितीची शक्यता असते तिथे व जिथे उंदरांचा प्रादुर्भाव आढळतो अशा ठिकाणी विषारी गोळया टाकून तसेच रात्रपाळी संहारणाद्वारे उंदीर नियंत्रणाचे काम नियमितपणे करण्यात येते. त्याव्यतिरिक्त दैनंदिन तक्रारीच्या अनुषंगाने तसेच विभागात उंदराचा प्रादुर्भाव असलेल्या मार्केटच्या सभोवतालचा परिसर, गलिच्छ वस्त्या इत्यादी ठिकाणी विषारी गोळया टाकणे इत्यादी प्रकारे उंदीर नियंत्रणाचे काम व उंदीरनाशक मोहीम सुरु ठेवलेली आहे.
लेप्टोस्पायरोसिस वा प्लेग सारख्या रोगांच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या उंदीर मोठ्या प्रमाणात नासधूस देखील करत असतात.उंदरांचे पुढचे दात (Incisor teeth) सतत वाढत असतात. सतत वाढणा-या या दातांची झिज व्हावी व ते नियंत्रणात असावेत, याकरिता उंदीर कायम कुठल्यातरी वस्तू कुरतडत असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूंची नासधूस होऊन आपल्याला अनेकदा आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागते. यामुळेच मोठ्या प्रमाणात असणारा उंदरांचा प्रजनन-दर, उंदरांमुळे होणारा संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस थांबावी, यासाठी प्रभावी 'मूषक नियंत्रण'अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.
वेगाने वाढणा-या उंदरांच्या व घुशींच्या संख्येस शहरीकरणातील अनेक घटक देखील कारणीभूत असतात. शहरी परिसरातील अनेक ठिकाणी असणारा स्वच्छतेच अभाव, उघडयावर अन्नपदार्थ विकणारे विक्रेते व कुठेही कचरा फेकण्याची अनेकांची सवय आणि त्यातून उंदरांना सहजपणे मिळणारे अन्न यामुळे उंदरांची संख्या वाढण्यास हातभारच लागतो. मूषक नियंत्रणासाठी स्वच्छतेविषयक जागरुकता असणे, हा अतिशय महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. अतिशय स्वच्छ ठेवलेल्या एखादया गृहनिर्माण सोसायटीत देखील आजुबाजूचा परिसर अस्वच्छ असल्यामुळे तेथे उंदराचा उपद्रव आढळून येतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'मूषक नियंत्रण चतुःसूत्री' (4D) चा अवलंब करणे अत्यंत गरजेचे
मूषक नियंत्रण चतुःसूत्री मध्ये उंदरांचा घरात प्रवेश होऊ नये याची खबरदारी घेणे, उंदरांना आसरा मिळणार नाही, उंदरांना खाद्य मिळणार नाही याची दक्षता घेणे व उंदरांना मारणे या ४ बाबींचा अंतर्भाव होतो. { 4D includes:- 1) Deny Entry to Rats 2) Deny Shelter to Rats 3) Deny Food to Rats & 4) Destroy Rats }. उंदीर व घुशींच्या संख्येवर प्रभावी नियंत्रणासाठी आपल्या घराच्या व सभोवतालच्या जागेमध्ये स्वच्छता नियमितपणे राखणे आवश्यक आहे. घरामध्ये आणि इमारतीमध्ये मूषकरोधक (Rat Guard) बसविणे तसेच उंदीर घरात शिरु नयेत यासाठी दरवाजाबाहेर दगडी उंबरठा बसवून घेणे इत्यादी उपाययोजना करुन घरामध्ये उंदरांच्या प्रवेशास प्रतिबंध करणेही आवश्यक आहे. मूषक नियंत्रणाच्या दृष्टीने महापालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे देखील आवश्यक आहे, असेही राजन नारिंग्रेकर यांनी नमूद केले आहे.
महापालिका कर्मचा-यांमार्फत मूषक नियंत्रणाचे काम प्रामुख्याने ४ पद्धतीने केले जाते. ज्यामध्ये उंदीर पकडण्यासाठी सापळे लावणे,विषारी गोळया टाकणे, बिळ्यांची विषारी गोळ्यांनी वाफारणी करणे तसेच रात्रीच्यावेळी काठीने उंदिर मारणे; या चार पद्धतींचा समावेश होतो. या पध्दतींव्दारे जानेवारी ते डिसेंबर २०१६ या एक वर्षाच्या कालावधी दरम्यान एकूण २ लाख १० हजार ७३७ उंदिर मारण्यात आले आहेत. या दरम्यान नागरिकांच्या एकूण १०,५५१ तक्रारींचे निवारण देखील करण्यात आले. त्याचबरोबर यावर्षी म्हणजेच २०१७ मध्ये जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांच्या कालावधी दरम्यान एकूण ८१,०५० उंदिर मारण्यात आले आहेत. याच कालावधीदरम्यान नागरिकांच्या एकूण ३,७१५ मूषक विषयक तक्रारींचे निवारणही करण्यात आले आहे, असेही कीटकनाशक खात्याचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी कळविले आहे.