नऊ महिन्यांत टॅक्सींचे २७६८ परवाने निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 May 2017

नऊ महिन्यांत टॅक्सींचे २७६८ परवाने निलंबित


मुंबई : टॅक्सी चालकांची मुंबईत अरेरावी वाढत चालली असून अनेकदा त्यांना वाहतूक पोलीस समज देतात; परंतु त्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येते. मात्र, या टॅक्सी चालकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन मुंबईतील ३ प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी ९ महिन्यांच्या कालावधीत २७६८ टॅक्सी परवाने निलंबित केले आहेत. या प्रकारामुळे टॅक्सी चालकांना शिस्त लागेल आणि ते प्रवाशांशी सौजन्याने वागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काहीही असो, प्रवाशांशी गैरवर्तन करणे या टॅक्सी चालकांना चांगलेच भोवले आहे. 


मुंबईतील टॅक्सी चालकांकडून जवळचे प्रवासी नाकारणे, प्रवाशांसोबत असभ्य वर्तन करणे, मीटरपेक्षा अधिक भाडे घेणे, महिलांना पुढील आसनावर बसण्यास प्राधान्य न देणे, अशा बेशिस्त वर्तनाला प्रवाशांना सामोरे जावे लागत होते. टॅक्सी चालकांविरोधात तक्रारी वाढताच वाहतूक पोलिसांनी त्यांना समज देऊन त्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे, असे बजावण्यात आले होते; परंतु त्यांच्याकडून कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर मुंबईतील ३ प्रादेशिक परिवहन कार्यालयांना एप्रिल २0१६ ते जानेवारी २0१७ पर्यंत ३८९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २७६८ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. कसूरदारांकडून १३ लाख ३९ हजार ७00 रुपये दंड वसूल करण्यात आला व एकूण २७६८ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Post Bottom Ad