नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवा अर्थात आयपीएस अधिकार्यांना वरिष्ठ पदावर बढती हवी असेल तर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील घुसखोरीविरोधी, दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा अथवा सायबर गुन्हे यांसारख्या किमान एखाद्या विषयात तरी विशेष प्रावीण्य प्राप्त करणे आवश्यक असणार आहे. या नव्या नियमाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार आयपीएस अधिकार्यांना पोलीस उप-महानिरीक्षक(डीआयजी), पोलीस महानिरीक्षक(आयजी) किंवा अतिरिक्त पोलीस महासंचालक(एडीजी) या पदांवर बढती हवी असेल तर पोलीस दलाच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करावे लागणार आहे. याशिवाय पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी संबंधित प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. डीआयजी पदावर बढती मिळविण्यापूर्वी एका तरी कार्यक्षेत्राचा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागणार आहे. तर आयजी अथवा एडीजीसाठी दोन किंवा तीन कार्यक्षेत्रांचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असेल. अधिकार्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणार्या अहवालात त्याच्या विशेष क्षेत्रातील प्रावीण्याचा उल्लेख केला जाईल. दहशतवादविरोधी, घुसखोरीविरोधी, दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा, आर्थिक गुन्हे अथवा सायबर गुन्हे, नक्षलविरोधी मोहीम अशा पोलीस दलाच्या अखत्यारित येणार्या विविध विषयांपैकी एकामध्ये आयपीएस अधिकार्यांना प्रावीण्य मिळवावे लागणार आहे. याशिवाय भ्रष्टाचारविरोधी आणि सतर्कता, पोलीस संशोधन आणि विकास, सीबीआय अथवा सीआयडी, गुप्तचर विभाग यापैकीही एका क्षेत्राची निवड करता येईल. यासंदर्भात हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमी आणि देशातील इतर संस्थांना प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती.