झिका आजाराचा सामना योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसह शक्य - डॉ. दीपक सावंत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झिका आजाराचा सामना योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसह शक्य - डॉ. दीपक सावंत

Share This

मुंबई, दि. २९ : झिका आजाराचा विषाणू *भारतात* आढळून आला असला तरी त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह झिका आजाराचा धोका टाळता येऊ शकतो, आरोग्य विभागाने त्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.


झिका आजारासंबंधी माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले कि, “ झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर पुरळ उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही परंतु पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो”

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले कि, “राष्ट्रीय रोगनिदान संस्था, नवी दिल्ली आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे झिका आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. संशयित रुग्णांनी तात्काळ या ठिकाणच्या रोगनिदान केंद्राशी संपर्क साधून या रोगावर उपचार घ्यावेत. झिका आजारावर अद्यापपर्यंत कुठलीही लस अथवा विशिष्ट औषधोपचार प्रणाली विकसित नसल्याने प्रतिबंध हाच त्यावर सर्वोत्तम उपाय ठरतो. त्यामुळे संशयित रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी”

रुग्णांनी पुरेशा प्रमाणात विश्रांती घ्यावी तसेच निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे. तापाकरिता पैरासिटामोल हेच औषध वापरावे.एस्पिरिन अथवा एन. एस. ए. आय. डी प्रकारातील औषधांचा वापर करू नये. झिका आजाराचा प्रसार एडीस या डासापासून होत असल्याने नागरिकांनी घर, सोसायटी परिसरात डास निर्मूलनाची मोहीम हाती घ्यावी. डास होणार नाहीत यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी. झिका हा आजार कीटकजन्य आहे. त्याचा प्रसार हवेमार्फत होत नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages