मुंबईतील नालेसफाई ८६.८७ टक्के झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 May 2017

मुंबईतील नालेसफाई ८६.८७ टक्के झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा


मुंबई (प्रतिनिधी)- मुंबईतील बहुतेक नाल्यात गाळ तसाच असल्याचे चित्र असताना पालिकेने मात्र आजपर्यंत ८६.८७ टक्के सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. मागीलवर्षी हे प्रमाण ७२.१३ टक्के एवढे होते.छोट्या नाल्यांची कामे विभाग स्तरावर सुरु असून ती मुदतीत पूर्ण होतील, असा दावा पालिका अभियांत्रिकी सेवा व प्रकल्पांचे प्रभारी संचालक प्रकाश कदम यांनी केला आहे.

मुंबईतील नालेसफाईच्या कामाला उशीराने सुरुवात झाली. मात्र, ही कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. मोठ्या नाल्यांतून साधारणपणे १ लाख ९१ हजार ६८२ मेट्रीक टन गाळ येत्या पावसाळ्यापूर्वी हटविणे अपेक्षित आहे. यापैकी २७ मे २०१७ पर्यंत सुमारे १ लाख ६६ हजार ५२२ टन गाळ काढला होता. गेल्यावर्षी 'मे' च्या चौथ्या आठवड्याच्या अखेरपर्यंत मोठ्या नाल्यांतून सुमारे १ लाख ३६ हजार ४३८ मेट्रीक टन एवढा गाळ काढण्यात आला. यंदा ८६.८७ टक्के एवढी नालेसफाई झाली असून मागीलवर्षी हे प्रमाण ७२.१३ टक्के एवढे होते. पश्चिम उपनगरांमध्ये ९२ हजार ९२० मेट्रीक टन (८२.०८ टक्के); तर पूर्व उपनगरांमध्ये ५९ हजार ८७४ मेट्रीक टन (९७.४३ टक्के) एवढा गाळ काढून व वाहून नेण्यात आला. गेल्यावर्षी हेच प्रमाण पश्चिम उपनगरांमध्ये ८४.३४ टक्के; तर पूर्व उपगनरांमध्ये ६८.६१ टक्के एवढे होते. तसेच मिठी नदीमधील गाळ काढून व वाहून नेण्याचे काम देखील प्रगती पथावर असून २७ मे २०१७ पर्यंत ८०.४९ टक्के काम पूर्ण झाले आहे. छोट्या नाल्यांच्या व रस्त्यालगतच्या वाहिन्यांच्या सफाईची कामे विभाग स्तरावर केली जात असून ती स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केली जात ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, असे कदम यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad