मुंबई / अजेयकुमार जाधव -
मुंबई महापालिकेच्या वतीने नाले बनवताना त्या ठिकाणच्या पात्र झोपड़ी धारकाना पर्यायी घरे दिली जातात. मात्र मानखुर्द सोनापूर येथील जयहिंद नगर मधील 19 झोपड़ीधारकाना गेल्या 14 वर्षात महापालिकेने पर्यायी घरे दिलेली नाहीत. पर्यायी घरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याने महापौरांकडे न्याय मागितला मात्र त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नसल्याने रहिवाश्यांनी आत्महत्येचा इशारा महापालिकेला दिला आहे. काळुराम भालेराव यांनी तसे इशारा पत्र महापौर, आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त इत्यादींना दिले आहे.
मानखुर्द सोनापूर जयहिंद नगर येथील नाला बनवताना सन 2003 मध्ये येथील कलेक्टरच्या जागेवरील झोपडी धारकाना पर्यायी घरे देवू असे आश्वासन पालिकेने दिले होते. या जागेवरील 97 - 98 लोकांचे मंडाळा येथे तर काही लोक कोर्टात गेले त्यांचे भुजबळ वाडी येथे पुनर्वसन करण्यात आले. तर 24 लोकांचे पुनर्वसन बाकी होते. मुंबई महापालिकेने राज्य सरकारकड़े या लोकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली असता इतर लोकांचे पुनर्वसन पालिकेने केले असल्याने या उर्वरित लोकांचे पुनर्वसनही पालिकेने करावे असा सल्ला राज्य सरकारने दिला होता.
2014 पर्यंत या उर्वरित लोकांचे पुनर्वसन पालिकेनेच करावे असे राज्य सरकार महापालिकेला सांगत होते. 2015 मध्ये सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांनी या लोकांची फ़ाइल अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांच्याकडे पाठवली असता ही फाइल बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे या 24 लोकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. या 24 पैकी काही लोक मुंबई बाहेर स्थायिक झाले आहेत. तर पालिकेच्या चुकीमुळे 19 लोकांवर 14 वर्षे भाड्याने रहावे लागत आहे.
महापालिका प्रशासनाने या लोकांना वाऱ्यावर सोडल्याने पर्यायी घरे द्यावीत अशी मागणी भालेराव यांनी महापौरांकड़े एप्रिल २०१७ ला केली होती. महापौरांनी याबाबत अतिरिक्त आयुक्त ( पूर्व उपनगरे ) यांना पत्र देवून त्वरित कारवाईचे आदेश दिले होते. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी अहवाल मागितला. या अहवालात झोपडीधारक पात्र होते परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने हि फाईल बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे. पालिका आम्हाला न्याय देण्यास अपयशी ठरल्याने पालिकेला १० जुलैची डेडलाईन देत पालिकेने न्याय न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा भालेराव यांनी दिला आहे. काही बरे वाईट केल्यास त्याला सर्वस्वी महापालिका जबाबदार असेल असे या पत्रात म्हटले आहे.
मानखुर्द मधील झोपडीधारकाना 14 वर्षात पर्यायी घरे नाहीच
महापौरांचे त्वरित कारवाईचे आदेश
https://jpnnews1.blogspot.in/2017/04/14varshat-ghare-nahit.html