मुंबई, दि. 12 : मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जलसंपदा विभाग, सामाजिक न्याय विभाग, सहकार विभाग, महसूल विभाग, गृह विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग आदी विभागाच्या 17 तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ निर्णय घेतले.
या लोकशाही दिनास सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, नगरविकास (1) विभागाचे प्रधान सचिव नितिन करीर, नगरविकास (2) विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृह विभागाचे प्रधान सचिव रजनीश सेठ, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, पोलीस महासंचालक सतिश माथुर, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए. एल. जऱ्हाड व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या लोकशाही दिनात नागपूर, पुणे, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, वाशिम, मुंबई उपनगर, यवतमाळ, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, औरंगाबाद व मुंबई या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता. सुनिल गुप्ता, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई यांच्या चोरी गेलेल्या मालमत्तेचा आणि नमूद गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये अशा संबंधितांना सूचना दिल्या.
निलेश नागावडे, ता. शिरुर, जि. पुणे यांची 1979 साली लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचा मोबदला व अनुषंगिक नुकसानभरपाई मिळण्याबाबत तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आजपर्यंतच्या लोकशाही दिनात 1346 तक्रारींपैकी 1342 तक्रारींवर निर्णय घेण्यात आलेला आहे.