मुंबई / प्रतिनिधी - मध्य प्रदेश येथील मंदसौर येथे शेतकऱ्यांवरील अत्याचार आणि राज्यातील शेतकरी संपाबाबत भाजपा सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी दुपारी घाटकोपर रेल्वे स्थानकात घाटकोपर युथ काँग्रेस अध्यक्ष सुधांशू भट्टच्या नेतृत्वाखाली रेल रोको आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी १३ आंदोलनकर्त्यांना १७४/१, १४७, १४६, १४५ रेल्वे कायद्यानुसार अटक करून रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असता आंदोलनकर्त्यांना १९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारून न्यायालयाने जामीन मंजूर केला.
महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. मंदसौर येथे शेतकऱ्यांवर भाजपा सरकारने गोळीबार केला आहे. या शेतकऱ्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी भेटण्यास गेले असता त्यांना तेथे जाण्यापासून रोखण्यात आले. नंतर राहुल गांधी यांना अटकही करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल रोको करण्याचे जाहीर केले. घाटकोपर रेल्वे स्थानकात रेल रोको होणार याची माहिती मिळाल्याने रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे पोलीस आधीच तैनात करण्यात आले होते. जीआरपी आणि आरपीएफचे पोलीस स्थानकात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते.
आंदोलनकर्ते एक नंबर फलाटावरून येतील अशी अपेक्षा पोलिसांना असल्याने एक नंबर फलाटावर पोलीस वाट बघत असतानाच युथ काँग्रेसचे कार्यकर्ते एक एक करून जमू लागले. दोन नंबर फलाटावर लोकल येत असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना गराडा घातला आणि लोकल पुढे कशी जाईल याचा प्रयत्न करत असतानाच अचानक कार्यकर्ते लोकल समोर उड्या मारून घोषणा बाजी करू लागले. पोलिसांनी गराडा घालूनही अचानक पोलिसांच्या गराड्या बाहेरील कार्यकर्त्यांनी रेल रोको केला. पोलीस लोकल समोरील कार्यकर्त्यांना हटवण्यास गेले असतानाच आणखी इतर कार्यकर्त्यांनी लोकलसमोर उड्या मारत रेल रोको केला.