मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची बदली वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. देशमुख यांच्या जागी विजय सिंघल यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ए एल जऱ्हाड यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने ५ जून रोजी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. संजय देशमुख यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. संजय देशमुख यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडील आरोग्य विभागातील महापालिका रुग्णालयात लागणाऱ्या एनेस्थेशिया मशीनचा घोटाळा बाहेर आला होता. दोन वषर्षापूर्वी महापालिकेत रस्ते व नाले सफाई घोटाळा उघड झाल्यावर संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या सामितीने केलेल्या शिफारशीनुसार रस्ते घोटाळ्यात सहभागी अधिकारी, कंत्राटदार, थर्ड पार्टी ऑडिटर यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली होती. देशमुख यांनी बनवलेला रस्ते घोटाळ्यातील दुसरा अहवाल वर्षभर पालिका आयुक्तांकडे पडला आहे. यात रस्ते विभागातील अनेक अधिकाऱ्यांची नावे असल्याने हा अहवाल उघड करण्यात आलेला नाही. हा अहवाल उघड झाल्यास महापालिकेच्या रस्ते विभागाला टाळे ठोकावे लागणार अशी चर्चा आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजय सिंघल यांची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सिंघल हे १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. विजय सिंघल यांची उद्योग संचालनालयात सचिव (लघु व मध्य्म उद्योग) तथा विकास आयुक्त (उद्योग) येथे ऑगस्ट २०१६ मध्ये बदली करण्यात आली होती. त्या आधी सिंघल हे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
ए एल जऱ्हाड १९९७ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. जऱ्हाड हे कृषी आणि पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास विभागात सचिव म्हणून कार्यरत होते. जून १३ ते जानेवारी २०१५ या काळात जऱ्हाड यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यापूर्वी त्यांनी सेल्स टॅक्स विभागाचे अतिरिक्त आयुक्त पदावर तसेच मुख्यमंत्र्यांचे उपसचिव पदावर उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यांची ठाणे जिल्हाधिकारीपदाची कारकीर्द विशेष लक्षणीय ठरली आहे. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या ठाण्याचा सर्वांगिण अभ्यास करीत जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम तालुक्यांमध्ये हळद शेतीला प्राधान्य देत व त्या उत्पादनाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देत त्यांनी आदिवासी समाजाला स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी लक्षणीय कामगिरी केली आहे. याबद्दल त्यांना 'पिवळ्या क्रांतीचे जनक' असेही संबोधले जाते. हळद शेतीप्रमाणेच मोगरा व सोनचाफा लागवडीलाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यांना बेस्ट कलेक्टर अॅवॉर्ड २०११-१२ ने सन्मानित करण्यात आले आहे. ए. एल. जऱ्हाड यांच्या संकल्पनेतून साकारलेला नागरिकांचे श्रम व वेळ वाचविणारा व एकाच खिडकीवर विविध दाखले मिळवून देणारा 'सेतू' हा उपक्रम शासनामार्फत इंद्रधनू योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात राबविला गेला व त्याची दखल 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे.