मुंबई / प्रतिनिधी - मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी (३० मे) आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात आला मात्र या मोर्चाला शंभर लोकही जमली नसल्याने महामोर्चा गुंडाळून कार्यकर्त्यांनी आझाद मैदानातच बेमुदत उपोषण सुरु केले. उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी राज्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी रविवारी रात्री भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक संभाजी पाटील यांनी दिली.
राज्यभर लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चाचे निघाल्यावर आपल्या मागण्यांसाठी अखेरचा महामोर्चा मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात महामोर्चा काढण्यात आला. त्यासाठी आझाद मैदानात मराठा समाजाचे कार्यकर्ते जमले होते. मात्र मोर्च्यात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात अवघे १०० ते १५० लोक जमले या लोकांसह मंत्रालयावर मोर्चा काढायचा कसा असा पेच आयोजकांसमोर निर्माण झाला होता. त्यामुळे हा महामोर्चा रद्द करून, आझाद मैदानात संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली केदार कदम, सुभाष जाधव, अविनाश पवार, बन्सी डोके, दत्तात्रय सूर्यवंशी, सतीश शिंदे, श्याम आवारे यांच्यासह अनेक जण बेमुदत उपोषणाला बसले होते. जोपर्यंत मागण्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देंण्यात आला होता. अखेर गेले काही दिवस सुरु असलेल्या या उपोषणाकडे राज्य सरकारने लक्ष दिले असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने डॉ. रणजित पाटील राज्यमंत्री गृह (शहरे), विधी व न्याय विभाग, संसदीय कार्य यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सरसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्था जुलै महिन्यात कार्यनावायीट करण्यात येईल, प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृहांसाठी मराठा समाजाला जागा देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, तसेच आगामी पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासंबंधी निवेदन करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे. राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ३० मे पासून सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.