मुंबई, 12 June 2017 - देशात आणि राज्यातही वाढत्या दलित, आदिवासी, मुस्लिम समाजावरील हिंसा व त्यासोबतच वाढलेल्या फॅसिस्टवादी कारवायांच्या विरोधात आज दुपारी कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, ललित बाबर, सुरेश सावंत, मुमताज शेख आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागरराव यांची घेऊन आपल्या मागण्यांचे एक निवेदन राज्यपालांना सादर केले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारने या फॅसिस्टवादी कारवाया रोखाव्यात, आणि देशात सलोख्याचे वातावरण कायम ठेवावे अशी मागणी केली.
सहारनपूर तसेच देशात अनेक ठिकाणी दलित, आदिवासी, महिला तसेच मुस्लिम, ख्रिस्ती आदी अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हिंसेचे वाढते प्रमाण, प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी, देशभरात वाढलेले असहिष्णू याविषयी या निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व हिंसा आणि फॅसिस्टवादी कारवायांना आवर घालण्याचे आवाहन यात करण्यात आले असून राज्यपालांसोबतच अशाच प्रकारचे एक निवेदन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर हिंसा व वाढत्या फॅसिस्ट कारवायांविरोधात मुंबईत गेल्या दिवसांत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. यानंतर हे आंदोलन पुढे सुरू ठेवण्यासाठी व त्यासाठीच्या कार्यक्रमाची दिशा ठरविण्यासाठी 30 मे रोजी मुंबईत एक बैठक झाली होती, त्या बैठकीनंतर दुसरी बैठक 6 जून रोजी श्रमिक, दादर येथे झाली होती, त्यात भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. बाळासाहेब आंबेडकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, तिस्ता सेटलवाड आदींनी एक निवेदन राज्यपाल आणि राष्ट्रपतींना देण्याचा निर्णय घेतला होता.
यावेळी संविधान संवर्धन समिती, समता अभियान, राष्ट्र सेवा दल, जातिअंत संघर्ष समिती, राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियान, सर्वहारा जनआंदोलन, कचरा वाहतूक श्रमिक संघ, जनता दल (सेक्युलर), लाल निशाण पक्ष (ले.), सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस, सत्यशोधक ओबीसी संघटना, महाराष्ट्र मातंग एकता दल, गुंज एक आवाज, डी. वाय. एफ. आय., महाराष्ट्र युवा परिषद, एन. सी. पी. डी., चिराग प्रतिष्ठान, एस. एफ. आय., युवा क्रांती सभा, इंडियन्स सोशल मुव्हमेंट, नॅशनल ख्रिश्चन फोरम, प्रहार आदी संघटनांचे प्रमुख प्रतिनिधीही सहभागी झाले होते.