
मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या मुस्तफा डोसाला प्रकृती अस्वस्थामुळे पहाटे जे. जे. रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातील जेल वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. हायपरटेंशन आणि वाढलेल्या मधुमेहाच्या त्रासावरही मुस्तफावर उपचार सुरू होते. मुस्तफाच्या छातीतही संसर्ग झाला होता. ताप आणि छातीत दुःखू लागल्याची तक्रार केल्याने तुरूंगाधिकाऱ्यांनी पहाटे तीन वाजता केल्यावर डोसाला रूग्णालयात आणले होते. मात्र, आज (बुधवार २८ जून २०१७ ) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बाबरी मशीद 6 डिसेंबर 1992 ला पाडली. त्याचा बदला घेण्यासोबतच देशाची आणि विशेषतः मुंबईची अर्थव्यवस्था खिळखिळी व्हावी, या उद्देशाने हे स्फोट घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा न्यायालयाने मान्य केला होता. या बॉंबस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष सरकारी वकिलांनी मुस्तफा आणि फिरोजची 93 च्या बॉम्बस्फोटातील भूमिका स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे दाखले देत शिक्षेच्या युक्तिवादात विशेष टाडा न्यायालयात फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.
'मेरे भाई को जन्नत नसीब हुई' -
'मेरे भाई को जन्नत नसीब हुई', 'कोर्ट उसे क्या सजा देता, अल्लाहने उसे इन्साफ दिया.. सरकार तो उसे मारनेपर तुली थी' असा आरोप मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी मुस्तफा डोसाच्या नातेवाईकांनी केला.
