भुजबळ तुरुंगात, मग आशिष शेलार यांना वेगळा न्याय का ? - प्रीती मेनन शर्मा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 June 2017

भुजबळ तुरुंगात, मग आशिष शेलार यांना वेगळा न्याय का ? - प्रीती मेनन शर्मा


मुंबई / प्रतिनिधी - मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या बोगस कंपनी भागीदारांचे छगन भुजबळ यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी थेट संबंध असून शेलार हे स्वत: या प्रकरणात गुंतलेले आहेत. भुजबळांना तुरुंगात पाठवण्यात आले मग शेलार यांना का वेगळा न्याय देण्यात आला व त्यांच्यावर कशासाठी मेहेरनजर ठेवण्यात आली, असा प्रश्न आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवकत्या प्रीती मेनन शर्मा यांनी केला. मुख्यमंत्री शेलार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हि त्यांनी यावेळी केला. 

शेलार यांचे हात भ्रष्टाराचारामध्ये बरबटलेले असून शेलार यांच्याविरोधात सीबीआय चौकशी करण्याची धमक पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार का असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला . शेलार यांचा भागीदार बालदी याचे मनिलॉन्ड्रिंग प्रकरणातील छगन भुजबळ यांच्या कंपन्यांसोबत संबंध असून बालदी व शेलार हे भागीदार असून , या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची गरज आहे.

आशिष शेलार यांच्या विरोधात कारवाई करुन त्यांना विधिमंडळातून निलंबित करण्याची मागणी हि मेनन यांनी केली. सर्वेश्वर या बोगस कंपनीच्या माध्यमातून शेलार यांना चौदा कोटी रुपये कसे मिळाले व त्या कंपनी ने अठरा कोटी रुपयांची मालमत्ता कशी खरेदी केली शेलार यांच्या कंपनीला विनासायास अठरा कोटी रुपयांचे कर्ज मिळत असेल तर शेतकऱ्यांना कर्ज का दिले जात नाही. बाबा सिद्दीकी विरोधात झालेली कारवाई अतिशय योग्य आहे मात्र ती कारवाई शेलारांविरोधात का होत नाही याचे उत्तर मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शेलारांविरोधात वर्षभरापूर्वी मनी लॉन्ड्रिंग ची तक्रार करण्यात आली होती मात्र त्यावर अद्याप काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेलार हे सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याविरोधात तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही असे त्या म्हणाल्या.

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम चा जवळचा साथीदार रियाज भाटी हा थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत दिसतो. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असून भाजपला आता दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी संबंध का ठेवावे लागत आहेत, हे स्पष्ट होण्याची गरज मेनन यांनी यावेळी व्यक्त केली.

माझ्यावरील आरोप खोटे, बदनामीकारक व राजकीय हेतूने प्रेरित - आमदार अॅड आशिष शेलार
- माझ्यावर आज जे आरोप केले गेले आहेत ते जुनेच आहेत. त्‍याचा त्‍यात्‍या वेळी मी सविस्‍तर कागदपत्रांसह पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलेला आहे.
- सर्वेश्‍वर आणि रिध्‍दी या दोन कंपन्‍यांच्‍या नावे माझ्यावर आरोप करण्‍यात आले असले तरी माझा आता या कंपन्‍यांशी कोणताही संबंध नाही. मी राजिनामा दिल्‍याचे व अन्‍य कागदपत्र संबंधित यंत्रणेला सादर केली आहेत.
- अन्‍य कपंन्यांची व व्‍यक्‍तींची जी नावे माझ्याशी जोडली जात आहेत ती खोडसाळपणे जोडली जात आहेत.
- माझी कुणाशीही पार्टनशिप नाही. तसचे मी कुठल्‍याही कंपनीत संचालक मंडळावर नाही. त्‍यामुळे त्‍या कंपन्‍यांमधील अन्‍य कोणा व्‍यक्‍तीचे अन्‍य कुणाशी असलेल्‍या व्‍यवहाराशी माझा संबध नाही आणि मला त्‍यांची कल्‍पना नाही.
- छगन भूजबळ यांची जी चौकशी सुरू आहे. त्‍याच्‍याशी संबंधित कंपन्‍या, व्‍यक्‍तीशी माझा प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्ष कोणताही संबंध नाही. त्‍यामुळे हे आरोप माझी बदनामी करणारे आहेत.
- रियाज भाटी हा राष्‍ट्रवादीचा कार्यकर्ता असल्‍याचे त्‍यांने जाहीरपणे सांगितले आहे त्‍याचा माझ्याशी काहीही संबध नाही. तो एका क्‍लबचा मेंबर असल्‍याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो मतदार आहे. त्‍याचे माझ्यासह अन्‍य सर्वपक्षीय नेत्‍यांसोबत फोटो आहेत.
- वानखेडे स्‍टेडियम व बिकेसीतील क्‍लब बाबत जे आरोप केले आहेत त्‍यावेळी मी एमसीएचा अध्‍यक्ष अथवा व्‍यवस्‍थापकीय कार्यकारणीचा सदस्यही नव्‍हतो. त्‍यामुळे त्‍यांच्‍याशी माझे नाव जोडणे हे निव्वळ माझ्यावर अन्‍याय करणारे आहे. ते आरोप व्‍यक्‍तीगत आकसातून करण्‍यात येत आहेत.
- भाजपाचे अन्‍य मंत्री व माझे सहकारी यांच्‍याबाबतही जूनेच आरोप पुन्‍हा एकदा नव्‍याने करण्‍यात आले आहेत त्‍याबाबत स्‍वतः मुख्‍यमंत्र्यांनी सभागृहात खुलासा केलेला आहेच.

Post Bottom Ad