राणीबागेत कच-यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2017

राणीबागेत कच-यापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प


मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' येथे दरदिवशी जमा होणाऱ्या १ हजार किलो पालापाचोळा व जैविक कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यात गांडूळ आणि खत याचे आपोआप विलगीकरण होणार आहे. या प्रकल्पातून तयार होणारे गांडूळखत व जीवामृत महापालिकेच्याच उद्यानांमध्ये वापरण्यात येईल, अशी माहिती पालिका स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांनी दिली.

४८ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात अनेक वृक्ष, झाडी, प्राणी,पक्षी इत्यादी आहेत. या उद्यानात झाडांचा पालापाचोळा,फांद्या, प्राण्यांना देण्यात आलेल्या भोजनाचे अवशेष, प्राण्यांचे मलमूत्र यासारखा दररोज सुमारे १ हजार किलो एवढा जैविक कचरा तयार होतो. हा कचरा आतापर्यंत क्षेपणभूमीवर पाठविण्यात येत होता. मात्र या कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत निर्मिती करण्यात येणार आहे. बागेच्या मुख्य अंतर्गत प्रवेशद्वाराजवळली सुमारे १३८७ चौरस फूटाच्या जागेत हा गांडूळ खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत पालिकेने श्री आस्था महिला बचत गटाच्या सहकार्याने हा अभिनव प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पामध्ये खतनिर्मितीनंतर खत व गांडूळ यांचे विलगीकरण आपोआप होणार असून अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच पाहणी केली. याप्रसंगी राणीच्या बागेचे उपायुक्त सुधीर नाईक, घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार, प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी संचालक डॉ. संजय त्रिपाठी, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प पालिकेने कार्यान्वित केला आहे.

राणीच्या बागेत उभारण्यात आलेल्या अभिनव प्रकारच्या गांडूळखत निर्मिती प्रकल्पाच्या धर्तीवर आपल्या सोसायटीच्या परिसरात एखादा प्रकल्प उभारवायाचा झाल्यास इच्छुकांनी महापालिकेच्या विभाग कार्यालयातील घन कचरा व्यवस्थापन खात्याशी संपर्क साधावा. तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वय अधिकारी सुभाष दळवी यांच्याशी सकाळी ११ ते ५ या वेळेत ९८३३५७८९९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Post Bottom Ad