मुंबई / प्रतिनिधी -
महापालिका अभियंत्यांच्या कामाची व्याप्ती (Work Load) खात्यांनुसार वा ऋतूचक्रानुसार कमी अधिक होऊन असमानता येत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांच्या कामाची समसमान विभागणी होण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना राबविता येऊ शकते? याची पडताळणी व अभ्यास करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये उपायुक्त (परिमंडळ – ४) किरण आचरेकर, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे आणि उपायुक्त (दक्षता) प्रकाश कदम यांचा समावेश आहे.
पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिकेद्वारे विविध स्तरावर अनेक प्रकारची कामे हाती घेऊन पूर्ण केली जात असतात. यात महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कार्यरत असणा-या साधारणपणे ४ हजार अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र पावसाळ्यादरम्यान महापालिकेच्या काही खात्यातील अभियंत्यांच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढते; तर काही खात्यातील अभियंत्यांच्या कामाचे प्रमाण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कमी होते. हे लक्षात घेता महापालिका अभियंत्यांच्या कामाच्या व्याप्तीची समसमान विभागणी करण्याच्या दृष्टीने अभ्यास समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने त्यांचा अहवाल पुढील एका महिन्यात महापालिका आयुक्तांकडे सादर करावयाचा आहे.