
मुंबई / प्रतिनिधी - किमान वेतन व इतर मागण्यांसाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविका वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर गुरुवारी, 29 जून रोजी धरणे आंदोलन करणार आहेत. महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात १८६ आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या चार हजार महिला आरोग्य सेविका सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांना किमान वेतन बारा हजार रुपये झालेले असताना त्याची अमलबजावणी करण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात असताना कामगार आयुक्तालयांकडूनही डोळेझाक केली जात आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. अंमलबजावणी होत नसल्याने आरोग्य सेविकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे. सेविकांना प्रसूती विषयक अधिनियम लागू असताना सदर कायद्यान्वये मिळणारे फायदे पालिकेच्या आरोग्य सेविकांना दिले जात नाहीत. प्रसूतीच्यावेळी गैरहजर राहिल्याबद्दल सेवामुक्त करण्यात येते. या सर्व बाबीमुळे आरोग्य सेविकांमध्ये तीव्र असंतोष आहे. कामगार आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे व किमान वेतनाचे दावे, प्रसूती विषयक कायद्यान्वये तक्रारीचे प्रलंबित असलेले दावे निकाली काढले जात नाहीत. यामुळे आरोग्य सेविकांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे, असे देवदास यांनी सांगितले.