मुंबई, दि. २९ - इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगार व त्याच्या कुटुंबियांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २ जून २०१७ पासून लागू करण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कर्करोग, बालकांवरील उपचार, वृध्दांवरील उपचार, Hip and Knee replacement, सिकलसेल, ॲनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू या आजारांचा समावेश करण्यात आला आहे. रक्त विकार शास्त्र या विशेषज्ञ सेवेसह ३१ विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण ११०० प्रोसिजर्सचा समावेश व १२७ पाठपुरावा नवीन सेवांचा व उपचारांचा समावेश ही योजनेत करण्यात आलेला आहे. याशिवाय १११ प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकरीता राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार यांनी स्वतःच्या आणि त्याच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळण्याकरिता मंडळाच्या ओळखपत्रामध्ये त्याच्या कुटुंबाचा तपशील नमूद असणे अनिवार्य आहे. बांधकाम कामगारांना देण्यात येणारे नोंदणी प्रमाणपत्र/ ओळखपत्र हा विमा संरक्षण देण्याकरिता पुरावा म्हणून पुरेसा समजण्यात येणार आहे. संबंधित शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.