
पीआरपीच्या आझाद मैदानातील उपोषणाला यश
मुंबई / प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गुंडगिरी व दहशतीचे प्रमाण वाढत चालले आहे. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत असलेल्या पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या यांच्यावर करावी करावी या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विक्की मोरे यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक २९ जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस महासंचालकांनी उपोषणकर्त्या शिष्ठमंडळाला भेट दिली या भेटी दरम्यान बुधवंत यांच्याबाबतचा अहवाल नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांकडून मागवण्यात आला आहे. या अहवालानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन अप्पर पोलीस महानिरीकक्षक विजय खरात यांनी दिल्याची माहिती मोरे यांनी दिली. पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या आश्वासनामुळे आपण आपले उपोषण मागे घेत असल्याचे मोरे यांनी सांगितले. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात सरकारने विशेष लक्ष पुरविले आहे. कुपोषणावर राज्य सरकार विविध उपाय योजना आखत असले तरी या जिल्ह्यातील शहाड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सरकारच्या गृहविभागाला अपयश आल्याचा आरोप विक्की मोरे यांनी केला आहे. या तालुक्यात मागील एक वर्षापासून गुंडगिरीने कहर केला असून दिवसाढवळ्या खून लुटमार मारामाऱ्यासह अवैध धंद्यामुळे हा जिल्हा बदनाम होत चालल्याची खंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. शहादा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसविली जात असतानाच येथील पोलीस अधीक्षक यांचा गुंडांवर कोणताही वचक नसल्याने पोलिसांच्याच सहकार्याने येथील गैरप्रकार वाढल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. गुंडांची दहशत व पोलिसांचे साटेलोट्यामुळे तक्रारदार देखील पुढे येत नाहीत, या बाबत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मोरे यांनी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही होत नसल्याने सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण शहादा येथील नागरिकांसह मुंबईत उपोषण आंदोलन करीत असल्याचे मोरे यांनी सांगितले. या आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मिरज जिल्हाध्यक्ष जैलाबभाई शेख, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष विकास निकाळे यांच्यासह विविध संघटनाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
