‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी ‘इस्क्रो’ अकाऊंट बंद करा - अनिल कोकीळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 June 2017

‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी ‘इस्क्रो’ अकाऊंट बंद करा - अनिल कोकीळ


नुकसानीच्या मार्गावरील फेर्‍या कमी केल्या जाणार - 
मुंबई / प्रतिनिधी - आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी ‘इस्क्रो’ अकाऊंट बंद करा, तसेच नुकसानीच्या मार्गावरील फेर्‍या कमी करणे, फायद्याच्या मार्गावर गाड्या वाढवणे आणि आवश्यकतेनुसार नवीन बस फेर्‍या सुरू करा अश्या मागण्या बेस्ट संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पालिकेतील बैठकीत करण्यात आल्या आहेत. आर्थिक डबघायीला आलेल्या बेस्टला वाचवण्यासंदर्भात एक बैठक मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांच्यासह भाजपा वगळता सर्व पक्षीय गटनेते, मान्यताप्राप्त युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ‘बेस्ट’च्या उत्पन्नातील मोठी रक्कम महापालिकेडून मिळालेल्या व इतर कर्ज परत करण्यात खर्च होते. पालिकेने बेस्टला दिलेली रक्कम महापालिका महिन्याच्या शेवटच्या दिवसात ‘इस्क्रो’ अकाऊंटमधून काढून घेते. यामुळे महिनाभर बेस्टची रक्कम या अकाऊंटमध्ये अशीच पडून असते. या रकमेचा वापर बेस्टला करता येत नाही. यामुळे कर्मचार्‍यांचे पगार रखडत असताना हि रक्कम वापरता येऊ शकते. यामुळे हे ‘इस्क्रो’ अकाऊंट बंद करावे अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केली. बेस्टची स्वायत्तता आणि अधिकार अबाधित ठेवून ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिन करावा अशी मागणीही कोकीळ यांनी केली. या बैठकीत ‘बेस्ट’ला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ घालण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अहवाल तयार करा असे निर्देश बेस्टच्या महाव्यवस्थापकांना देण्यात आल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.

महापालिकेने ‘बेस्ट’ला सोळाशे कोटींचे कर्ज दिले आहे. यावरील एक हजार २० कोटी व त्यावरील ५८० कोटींच्या व्याजाची परतफेड बेस्टने केली आहे. व्याज पकडून बेस्टने १६०० कोटी पालिकेला परत केले आहेत. पालिकेच्या नियमाप्रमाणे पालिकेने बेस्टला अनुदान द्यायला हवे होते. मात्र महापालिकेने बेस्टकडून व्याज कसे घेतले असा प्रश्न उपस्थित करत पालिकेने शिल्लक कर्ज माफ करावे किंवा उरलेले ५८० कोटी रुपये बिनव्याजी स्वीकारावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. आपल्याच उपक्रमाकडून व्याज आकारण्याची तरतूद नसताना महापालिकेकडून कोट्यवधीचे व्याज आकारले जातेच कसे असा सवाल, सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला. तसेच ‘बेस्ट’ला तातडीने एक हजार कोटींचे आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी जाधव यांनी केली.

बैठकीला भाजपची दांडी - 
मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या ‘बेस्ट’ला आर्थिक डबघाईतून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेसह, काँग्रेस व इतर विरोधी पक्ष, प्रशासन आणि सर्व कामगार संघटना एकत्र आल्या व बैठक संपन्न झाली. या बैठकीत बेस्टला वाचवण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवण्यात आल्या. मुंबईकरांसाठी आम्ही आहोत असे भाजपाकडून वेळोवेळी सांगण्यात येते. मात्र आज मुंबईकरांच्या लाईफ लाईन असलेल्या बेस्टबाबत महत्वपूर्वक बैठक असताना पहारेकरी असलेल्या भाजपचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. यामुळे भाजपला मुंबईकरांची कोणतीही फिकीर नसल्याची चर्चा बैठकी नंतर सुरु होती.

Post Bottom Ad