मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेची बाके लाकडाची बनवण्यासाठी झाडे कापावी लागतील यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो असे सांगणाऱ्या भाजपाने मात्र वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत प्रशासनाने आणलेले झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित करत आहे. भाजपा स्थायी समितीत पर्यावरण प्रेमी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मात्र याच्या नेमकी विरोधी भूमिका घेत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी भाजपाच्या पर्यावरण प्रेमाबद्दल उलट सुलट चर्चा रंगू लागली आहे.
भांडुपा एस विभागातील तुंगा व पासपोली गाव आणि कुर्ला, पवई,येथील लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या कार्यालयातील बांधकामाच्या प्रस्तावित इमारतीच्या कामात येणारे १९२ झाडे पुनर्रोपित करण्याचा व ८३ झाडे कापण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. या ठिकाणी एस विभागातील अधिकारी स्थळपाहणी करण्यासाठी गेले असता या ठिकाणची काही झाडे आधीच तोडल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. याबाबत आधुनिक चौकशी केल्यावर याबाबत पवई पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. हि चूक कंत्राटदाराने चुकीने केली असल्याचे कंपनीचे म्हणणे असून मुंबईत व मुंबई बाहेर आमची कंपनी स्वखर्चाने झाडे लावत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीवर जरी एफआयआर नोंद असला तरी झाडे तोडण्याच्या व पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव समांतरपणे स्विकारता येऊ शकतो असा अभिप्राय विधी खात्याने दिल्यावर असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला तर काँग्रेसच्या रवी राजा यांनी याठिकाणी भेट द्यायची मागणी करत हा प्रस्ताव राखून ठेवण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. मागील बैठकीत पालिका आयुक्तांना २५ झाडे तोडण्याच्या अधिकाराला शिवसेना आणि काँग्रेसने विरोध करून सभात्यागा केला होता. शिवसेना आणि काँग्रेसने केलेल्या सभात्यागा नंतर भाजपाच्या मदतीने प्रशासनाने मुलुंड येथील झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. आजच्या बैठकीतही भाजपा लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या कार्यालयातील बांधकामाच्या प्रस्तावित इमारतीच्या कामात येणारी झाडे तोडण्यास परवानगी देण्याच्या बाजूने होता. यामुळे सदर झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला राखून ठेवत शिवसनेने काँग्रेसच्या मदतीने भाजपाला खो दिल्याचे बोलले जात आहे.