सहाय्यक आयुक्ताच्या मुजोरीविरोधात पालिका सभागृह तहकूब - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सहाय्यक आयुक्ताच्या मुजोरीविरोधात पालिका सभागृह तहकूब

Share This

मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या अंधेरी ‘के’ पूर्व विभागातील सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याकडून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. जैन यांच्या आदेशाने विभागातील बांधकामांवर मनमानीपणे कारवाई सुरू आहेत. तसेच विभागातील विकासकामे रखडली आहेत. जैन यांच्या या मुजोरीविरोधात शिवसेने सह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात तक्रारींचा पाऊस पाडत जैन यांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या मागणीची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जैन यांच्या ‘कारभारा’ची चौकशी करून सभागृहात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच जैन यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभागृहाचे बांधकाम तहकूब करण्यात आले.


‘के’ पूर्व विभागातील सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्या मनमानी कारभाराविरोधात सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी हरकतीचा मुद्दा मांडला. जैन यांच्याकडून विभागातील सर्वच नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून कर्मचार्‍यांना लोकप्रतिनिधींविरोधात जाणीवपूवर्क भडकवले जात असल्याचे ते म्हणाले. जैन यांनी विकासकामांमध्ये खोडा घातल्याच्या निषेधार्थ २३ जूनची प्रभाग समिती सभा तहकूब करण्यात आली. याआधीची सभाही याच कारणाने तहकूब करण्यात आली. मात्र जैन यांनी कर्मचार्‍यांना आदेश देऊन लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी पहिल्या दिवशी काळ्या फिती बांधून, दुसर्‍या दिवशी काळे शर्ट घालून तर आज चक्क पूर्ण काळे कपडे घालून काम करायला लावले. २७ जून रोजी कामगारांना कार्यालायाबाहेर निदर्शने करायला भाग पाडल्याचे बाळा नर यांनी सांगितले. त्यामुळे जैन यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

महापालिकेच्या अनेक विभागात सहाय्यक आयुक्तांसारख्या अधिकार्‍यांकडून लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला. आयुक्तांच्या पाठिंब्यामुळेच अधिकार्‍यांची मनमानी सुरू असल्याचेही ते म्हणाले. सहाय्यक आयुक्तांची मुजोरी समोर येण्यासाठी त्यांच्या कार्यालयात सीसीटीव्ही लावण्याची मागणीही त्यांनी केली. अशा घमेंडखोर अधिकार्‍यांना जरब बसावी यासाठी महापालिका कायद्यातील कलम ‘८३-१’ नुसार चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी केली. नर यांच्या या हरकतीच्या मुद्दयाला भाजपाचे सुनील यादव यांनी पाठिंबा देत जैन यांच्या कृत्याचा पाढा वाचला. याला सपाचे रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी पाठिंबा देत अशा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही याचा निषेध करत ही सभाच तहकूब करण्यात यावी, अशी मागणी केली.

या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन दिले. यावर महापौर महाडेश्वर यांनी संबंधित हरकतीचा मुद्दा ग्राह्य धरत प्रकरणाची चौकशी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. नगरेसवकांच्या संतप्त भावना लक्षात घेत महापौरांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages