मुंबई - मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे होत असतात. त्याच प्रमाणे पाणी चोरी आणि फेरीवाल्यांच्या तक्रारीही पालिकेकडे मोठ्या प्रमाणात येत असतात. बहुतेक अवैध बांधकामे हि रात्री व सुट्टीच्या दिवशी सुरु असल्याने अश्या अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळेसही महापालिकेचा अतिक्रमण निमुर्लन विभाग सुरू ठेवावा, अशी मागणी भाजपच्या प्रकाश गंगाधरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली. सदर ठरावाच्या सूचनेला पालिका सभागृहाची मंजूर मिळाली आहे. सदर ठरावाची सूचना आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आली असून अभिप्रायानुसार अमलबजावणी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
रस्त्यांवर बसणारे फेरीवाले आणि अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेले पालिकेचे कर्मचारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कार्यरत असतात. त्यामुळे फेरीवाल्यांची संख्या संध्याकाळनंतर वाढते. अवैध बांधकामे, पाणीचोरी याचवेळी होते. मुंबईच्या विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळेस अवैध बांधकामे करण्याचे अवैध जलवाहिन्या टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. पालिकेचे विभाग संध्याकाळी साडेपाच वाजता बंद झाल्यानंतर यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही. त्यामुळे असे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर उपाय म्हणून परवाना, नियंत्रण, अतिक्रमण निर्मुलन, पाणी या विभागांतील कर्मचाऱ्यांचा कार्यकाल दिवसापुरता न ठेवता दोन किंवा तीन शिफ्टमध्ये ठेवण्यात यावा. त्यामुळे हे प्रकार थांबण्यास मदत होईल, अशी मागणी प्रकाश गंगाधरे यांनी सभागृहात केली. संध्याकाळी पालिकेचे महत्वाचे विभाग सुरू ठेवल्यास अनधिकृत प्रकरणांना आळा बसेल असेलही गंगाधरे यांनी म्हटले. या सूचनेला गुरुवारी सभागृहात मंजुरी मिळाली असली तरी त्यावर महापालिका आयुक्त काय अभिप्राय देतात, त्यानुसारच पुढिल अमलबजावणी केली जाणार आहे.