मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेच्या क्लीनअप मार्शलची दादागिरी कही केल्या कमी होताना दिसत नाही. क्लीनअप मार्शल कडून लोकांना दादागिरी करून लूटले जात असल्याचा प्रकार विक्रोळी येथील घटनेवरुन पुन्हा एकदा समोर आला आहे. लघुशंका करणाऱ्या एका टेम्पो चालकाला पालिकेच्या तीन क्लीन अप मार्शलनी लुटल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सोमवारी इम्रान शेख (28), नावेद शेख (28) आणि अरबाज अन्सारी (21) या तीन जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वर्सोवा येथे राहणारे दिलीप सावंत टेम्पो चालक रविवारी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. विक्रोळी येथील पाच खड्डा परिसरात लघुशंकेसाठी त्यांनी रस्त्यालगत टेम्पो उभा केला. दरम्यान, या परिसरात फिरत असलेले तीन क्लीनअप मार्शल त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाटील यांना दीड हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. मात्र पाटील यांनी हे पैसे भरण्यास नकार दिल्याने क्लीनअप मार्शलनी त्यांना जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील अडीच हजारांची रक्कम घेऊन पळ काढला. या घटनेनंतर पाटील यांनी त्वरीत विक्रोळी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत सोमवारी या तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचे समजते.