दहिसरच्या गणपत पाटील नगरला मिळणार मुबलक पाणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2017

दहिसरच्या गणपत पाटील नगरला मिळणार मुबलक पाणी


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या महापारौंनी घेतलेल्या पुढाकारामुळे दहिसर येथील खासगी जमिनीवर उभ्या असलेल्या गणपत पाटील नगरला मुबलक पाणी मिळणार आहे. तसा प्रस्ताव मुंबई महापालिका प्रशासनाने तयार करून स्थायी समितीच्या पटलावर मंजूरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावावर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणार असून महापौरांच्या आदेशाने हा प्रस्ताव आणला असल्याने सदर प्रस्ताव मंजुर केला जाण्याची शक्यता आहे.  

दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये खासगी जमिनीवर 9 हजार 668 घरे आहेत. सन 1995 च्या धोरणानुसार पालिकेने 32 अधिकृत जलजोडण्या दिल्या. मात्र त्यानंतर 2000 नंतरच्या झोपड्यांना पाणी पुरवठा करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. या निर्देशानुसार पालिकेने पाणी धोरण तयार केले. यात खासगी जागेंवरील झोपड्यांना वगळले. परिणामी खासगी झोपड्यांना पाणी देण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे खासगी जागेंवरील हजारो झोपड्या पाण्यावाचून वंचीत राहिल्या आहेत. या झोपड्यांना पाणी मिळावे, यासाठी दहिसरमधील स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र व्यवहार करुन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. महापौरांनी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी स्थायी समितीला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. या निर्देशानुसार पालिकेने याबाबतचा प्रस्ताव तयार करुन स्थायी समितीच्या पटलावर मंजूरीसाठी ठेवला आहे.

गणपत पाटील नगरमध्ये 14 गल्ल्या आहेत. प्रत्येक गल्लीत पाण्याच्या टाक्या बसविल्या असून खासगी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक टॅंकरसाठी झोपडीधारकांना दीड हजार रुपये मोजावे लागतात. शिवाय पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि महापौरांनी सुचविलेल्या पर्यायानुसार झोपडीधारकांना पाणी पुरवठा करावा, अशी मागणी घोसाळकर यांनी केली आहे. महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीत जमिनीच्या मालकांनी परवानगी दिल्यास पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी अट परिपत्रकात समाविष्ट करावी, असे निर्देश महापौरांनी दिले.

Post Bottom Ad