मुंबई /प्रतिनिधी - मुंबईच्या उभारणीमध्ये योगदान देणार्या महापुरुषांची तैलचित्रे महापालिका मुख्यालयातील सभागृहात लावण्यात आली होती. हि तैलचित्रे आगीमध्ये नष्ट झाली होती मात्र आता हि तैलचित्रे महापालिकेच्या मुख्य सभागृहात पुन्हा झळकरणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे मुंबईसाठी योगदान देणाऱ्या नऊ महापुरुषांची तैलचित्रे सभागृहात बसवण्यासाठी ४७ लाख २५ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
महापालिका सभागृहात २००२ मध्ये लागलेल्या भीषण आगीत महापुरुषांची मौलवान तैलचित्रे नष्ट झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या उभारणीत मोठे योगदान असणार्या विभूतींच्या कार्याचे स्मरण म्हणून या तैलचित्रांची पुनर्निमिती करण्यात यावी अशी मागणी माजी सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी केली होती. याची दखल घेत ही तैलचित्रे पुन्हा सभागृहात प्रदर्शित करण्याच्या प्रस्तावावर गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापालिकेच्या सभागृहाला लागलेल्या आगीत नष्ट झालेल्या महापुरुषांच्या ११ तैलचित्रांपैकी सध्या फक्त जगन्नाथ शंकरशेट व मोरेश्वर वासुदेव दोंदे यांची तैलचित्रे बसवण्यात आली आहेत. उर्वरित नऊ महापुरुषांमधील विठ्ठल चंदावरकर, जहांगिर वी. बोमन बेहराम, सदाशिव कानोजी पाटील, विठ्ठलभाई जवेरभाई पटेल, इब्राहीम रहिमतुल्ला, सर फिरोजशहा मेरवानजी मेहता, दिनशा रदुलजी वाच्छा, युसूफ जे. मेहर अली, खुर्शेद प्रेमजी नरीमन यांची तैलचित्रे नव्याने बसवण्यात येणार आहेत. तैलचित्रकार चंद्रकला कदम यांनी सभागृहात बसवण्यात येणार्या चित्रांमधील सर्व महापुरुषांच्या अभिलेखांचा शोध घेऊन मूळ छायाचित्रे जमविली आहेत. ही तैलचित्रे आठ फूट बाय पाच फूट आकाराच्या प्रतीमेसह बनवण्यात येणार आहेत.