पालिकेच्या रुग्णालयात नगरसेवकांना "नो इंट्री" व उद्धट वागणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2017

पालिकेच्या रुग्णालयात नगरसेवकांना "नो इंट्री" व उद्धट वागणूक


डॉक्टर व सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देण्याची नगरसेवकांची मागणी - 
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टारांना मारहाण झाल्याच्या प्रकारणानंतर रुग्णालयात खाजगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत. या खाजगी सुरक्षा रक्षकांनी नगरसेवकाना उद्धट वागणूक दिल्याचे तसेच पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्यालाच शिव रुग्णालयात जाण्यापासून रोखल्याचे प्रकरण स्थायी समितीत उपस्थित होताच या प्रकरणाची स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी खाजगी सुरक्षा रक्षकांना आणि डॉक्टारांना सौजन्याने वागण्याचे विशेष प्रशिक्षण देण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात डॉक्टर नगरसेवकांचे ऐकत नाहीत, नगरसेवकांना उद्धट उत्तरे दिली जातात, सुरक्षा रक्षकही नगरसेवकाना चांगली वागणूक देत नाहीत यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर जितेंद्र यांच्या विरोधात मेडिकल ऑफिसर तवाडिया यांच्याकडे तक्रार केली. परंतू त्यांनीही याकडे लक्ष दिलेले नाही. यामुळे शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर व सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका कमलजहाँ सिद्दीकी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

या हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा देताना विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी आपण शिव रुग्णालयात पालिकेने दिलेली विरोधी पक्ष नेत्यांची गाडी घेऊन गेलो असता आपल्याला गेटवर अडवण्यात आले. पालिकेची गाडी असताना आणि मी माझी ओळख करून दिल्यानंतरही सुरक्षा रक्षकांना काय करावे हे समजत नव्हते. यामुळे सुरक्षा रक्षक पालिकेच्या गाड्या आणि लोकप्रतिनिधींना ओळखत नसल्याचे दिसत असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी पालिका रुग्णालयात डॉक्टर आणि इतर पदे रिक्त असल्याने असे प्रकार होत आहेत. पालिका आजही १९६० सालच्या लोकसंख्ये प्रमाणे कर्मचाऱ्यांची भरती करते. हि भरती आजच्या लोकसंखेप्रमाणे करावी अशी मागणी पटेल यांनी केली.

तर पालिकेच्या विरोधी पक्ष नेत्याला पालिकेच्या गाडीमधून गेल्यावरही सुरक्षा रक्षक अडवत असतील तर हा प्रकार गंभीर आहे. डॉक्टरांना मारहाण झाली म्हणून आम्ही निर्णय घेऊन त्वरित खाजगी सुरक्षा रक्षक नेमले. आम्हाला अशी वागणूक मिळत असेल तर यावरून सामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल याचा विचार करायला हवा असे सांगत अश्या वागणुकीमुळेच सामान्य नागरिकांकडून डॉक्टरांना मारहाण होते असे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी म्हटले. पालिका आरोग्य विभागावर तीन ते साडेतीन कोटी खर्च करते. या डॉक्टरांचे आम्ही सर्व चोचले पुरवतो तरीही नगरसेवकांना उद्धट वागणूक मिळत असल्याने प्रशासनाने याचा जाब विचारावा अशी मागणी जाधव यांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉक्टर व सुरक्षा रक्षकांवर कारवाई होई पर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवत डॉक्टर व सुरक्षा रक्षकांना नगरसेवक व नागरिकांबरोबर सौजन्याने वागण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी प्रसासनला दिले.

Post Bottom Ad