लष्करात महिला सैनिकांची लवकरच भरती होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2017

लष्करात महिला सैनिकांची लवकरच भरती होणार


नवी दिल्ली - भारतीय लष्कराने सुधारणावादी भूमिकेचा अंगीकार करून देशापुढील आव्हानांचा आणखी कणखरपणे सामना करण्यासाठी महिलांना सुद्धा लष्करात भरती होण्याची संधी देऊ केली आहे, अशी माहिती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी रविवारी दिली. दरम्यान, हवाई दलात पायलट म्हणून महिला भरती सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगानंतर प्रत्यक्षात रणमैदानावर महिलांना सैनिक म्हणून कर्तव्य बजावण्याची संधी मिळणार आहे.

लष्करातील विविध संरक्षण दलांमध्ये महिलांना भरती करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर हाती घेतली जाणार आहे. सध्या लष्करात विशेषत: पुरुष सैनिकांचीच भरती केली जाते. मात्र लवकरच महिलांनासुद्धा जवान बनण्याची संधी मिळणार आहे. पुरुष जवानांच्या बरोबरीच्या पदावर महिलांची निवड केली जाईल, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले. 

भारतीय लष्कराच्या अखत्यारितील वैद्यकिय, विधी, शिक्षण, सिग्नल आणि अभियांत्रिकी आदी निवडक क्षेत्रात महिलांची नोकरभरती होत असते. लष्करी मुद्दे व मोहिमांची चिंता यामुळे थेट जवान म्हणून महिलांना भरती केले जात नाही. यापुढे ही पद्धत मोडीत काढून महिलांना भरती करण्यास मी तयार आहे, अशी कबुली रावत यांनी दिली. प्रस्तुत मुद्यावर सरकारसोबत चर्चा सूरू असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती रावत यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, नॉर्वे, स्वीडन आणि इस्रायल आदी देशांच्या लष्करात महिला जवान सेवारत आहेत. याच धर्तीवर आता भारतानेही लष्करात महिलांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे. 

Post Bottom Ad