मुंबई - राज्यभरात मुलींचा जन्मदर घटल्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना राज्याच्या राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत मात्र मुलींचा जन्मदर सुधारल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या वर्षी दर एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९३६ पर्यंत वाढल्याचे बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील काही वर्षांमध्ये मुलींचा जन्मदर वाढल्याचेच सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. प्रभावी जनजागृतीमुळे मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलल्याचा दावा पालिका प्रशासन करत आहे.
२०१४ मध्ये दर १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९३१ इतके होते. त्यात २०१५ साली ९३३ पर्यंत वाढ झाली. पाच वर्षांपूर्वीच्या आकडेवारीची तुलना केल्यास १ हजार मुलांमागील मुलींचे प्रमाण १४ ने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. गर्भलिंग निदान चाचणीसंबंधित नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्यामुळे शहरात मुलींचा जन्मदर वाढल्याचे चित्र दिसून येत असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईवगळता उर्वरित राज्याचा विचार करता मुलींच्या जन्मदराची चिंतनीय स्थिती आहे. संपूर्ण राज्यभरात २०१५ साली १ हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९०७ इतके होते. त्यात वाढ होण्याऐवजी २०१६ साली हे प्रमाण ८९९ पर्यंत खाली घसरले. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये मुलींचा चांगला जन्मदर असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचा मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन संपूर्ण देशभरासाठी आदर्शवत ठरू शकेल, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञ मंडळी देत आहेत..