![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjH40AnXwj1dU6rEzp5-p4DSPDjtgyMhwBUmB9xvr9jWPR7xJ1egHDUAuyitBC9g8mGsbNM2P1Hd3tyoTCRRyWCjUlBQ2mGbqf628J-IbXwY31IV783_pEUwQCsNu8MveHg8Qg5FdEj5NA/s640/congress.jpg)
शेतकरी कर्जमाफीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा - अशोक चव्हाण...
मुंबई / प्रतिनिधी -भाजपा सरकारला ३ वर्षे पूर्ण झाले म्हणून गेली दोन आठवडे देशात मोदी उत्सव साजरा केला जातोय. हा उत्सव साजरा करण्यापेक्षा देशाच्या एकंदरीत परिस्थितीवर चिंता आणि चिंतन करण्याची गरज आहे. भारताची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे, शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे. देशातील आंतरिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, सीमेवर जवान रोज शहीद होत आहेत, पाकिस्तानकडून वारंवार हल्ले होत आहेत, अशा परिस्थितीत मोदी उत्सव कसला साजरा करत आहेत. भाजपा सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. देशातील संपूर्ण जनतेला ३ वर्षापूर्वी जी आश्वासने दिली होती त्यापैकी किती आश्वासने पूर्ण झालेली आहेत हे भाजपने लोकांना सांगितले पाहिजे, त्याचबरोबर भारताच्या आर्थिक परिस्थितीवर भाजपा सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी केंद्रिय मंत्री आनंद शर्मा यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. यावेळी महराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार रजनी पाटील, प्रवक्ते सचिन सावंत व राजू वाघमारे आणि माजी आमदार चरणसिंग सप्रा उपस्थित होते.
आनंद शर्मा पुढे म्हणाले की ३ वर्षापूर्वी लोकांना जी आश्वासने दिलेली त्यापैकी एक हि आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. त्यांचे सर्व दावे फोल ठरलेले आहेत. फक्त दिखावा करत आहेत. जाहिरातबाजी करत आहेत. १५०० ते २००० करोड रुपये जाहिरातबाजीवर खर्च करत आहेत. लोकांचा पैसा जाहिरातबाजीवर उधळत आहेत. देशातील सर्व माध्यमांमध्ये जाहिराती देऊन खोटी प्रसिद्धी करत आहेत आणि सगळीकडे फक्त नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि प्रत्येक गोष्टीला नरेंद्र मोदिंचेच नाव. याबाबत कोणी यांना प्रश्न विचारला की त्याला देशद्रोही घोषित करून चौकशी मागे लावतात. यासाठी सरकारी व्यवस्था आणि सरकारी यंत्रणेचा हे सरकार दुरुपयोग करत आहेत. असे याआधी कधीच झाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनम्रता आणि शालीनता अजिबात नाही. दर वर्षी दोन करोड रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते म्हणजेच तीन वर्षात ६ करोड रोजगार दिले पाहिजे होते. आमची दुसरी मागणी अशी आहे की भाजपा सरकारने किती व कोणाकोणाला रोजगार दिला याचा संपूर्ण तपशील नाव, पत्ता, नंबर सहित जाहिर करावा. यांनी दहा लाख हि रोजगार दिलेले नाहीत. याउलट नोटाबंदिमुळे २.५ करोड लोकांचा रोजगार व व्यवसाय गेलेला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. जीडीपी खाली घसरलेला आहे. नवीन गुंतवणूक नाही, नवीन प्रोजेक्ट नाहीत. राष्ट्रीय स्तरावर कोणतीच मोठी गुंतवणूक नाही. भाजपा सरकारने गेल्या दहा वर्षातील जीडीपीची आकडेवारी देशाच्या जनतेसमोर आणावी, मग लोकांना कळेल की कॉंग्रेसच्या राज्यात जीडीपी दर नेहमी उंचावलेला होता आणि मागील तीन वर्षात भाजपा सरकारच्या काळात जीडीपी दर खाली घसरलेला आहे, त्यामुळे त्यांनी आकडेवारी जाहिर करावी. या सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे, अशा काही मागण्या काँग्रेसतर्फे आनंद शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या.
महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकरी संपाबाबत या सरकारने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे. शेतकरी संप संपलेला नाही. सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संप तोडण्याचा प्रयत्न केला. पण ते अयशस्वी ठरलेले आहेत. शेतकरी छोटा किंवा मोठा नसतो. सरसकट सगळ्यांची कर्ज माफी हि झालीच पाहिजे, अशी आमची मागणी आहे. शेतकरी संपाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. भाजपा सरकारने फेरविचार करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे.