मुंबई, दि 1 June 2017 - नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदविणे सोपे जावे यासाठी भारत निवडणूक आयोग 1 जुलै ते 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहिम राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहे, अशी माहिती उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी आज दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मोहीमेसंदर्भात मंत्रालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत वळवी यांनी माहिती दिली. यावेळी अवर सचिव तथा उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.
वळवी म्हणाले की, राज्यात 18 ते 19 या वयोगटातील 12 लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी तसेच युवा वर्गात मतदानासंदर्भात प्रबोधन व्हावे या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्जासोबतच नमुना - 6 सुद्धा घेण्यात येणार आहे. यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांकडून भविष्यातील मतदार म्हणून प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात येणार आहे. याचबरोबर प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये जाऊनही नाव नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहीमेमुळे तरुणांना तसेच नागरिकांना मतदार नाव नोंदणी करणे सहजसोपे होणार असल्याचे वळवी यांनी सांगितले.
मोहोड यांनी या मोहिमेची अधिक माहिती देताना सांगितले की,मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात, पोस्टाद्वारे, एनव्हीएसव्ही येथे ऑनलाईन पद्धतीने तसेच नागरी सेवा केंद्रात मतदार नाव नोंदणीचा नमुना - 6 स्विकारण्यात येणार आहेत. याचबरोबर गृहनिर्माण संस्थेतील अध्यक्ष आणि सचिव यांनी त्यांच्या सोसायटीमधील मतदारांची अद्ययावत यादी देणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भातही आयोग पाठपुरावा करणार आहे. याचबरोबर अधिकृत मृत्यु नोंदवही मधील मृत्यु झालेल्या व्यक्तींचे नाव मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही विहित पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमे व्यतिरिक्त शासकीय आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृतीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये, संस्था इत्यादी येथे प्रवेशाच्या वेळीच लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीमध्ये नोंदविण्यासदंर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. यानुसारच या विशेष मोहिमेसाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची नोडल ऑफीसर म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे मतदारांमध्ये जागृती होऊन मतदानासाठीची संख्या वाढणार असल्याचेही मोहोड यांनी यावेळी सांगितले.