मुंबई / प्रतिनिधी - मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवतानाच त्यांच्यातील नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी दोन नवे मास्टर्स कोर्स सुरू केले आहेत. यामध्ये ‘इमोशनल इंटेलिजन्स अॅण्ड ह्युमन रिलेशन्स’ आणि ‘मास्टर्स इन इमोशनल इंटेलिजन्स अॅण्ड लाइफ कोचिंग’ हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुंबई विद्यापीठ आणि मास्टर माय लाइफ इक्यू एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेले हे कोर्स गरवारे इन्स्टिट्युट ऑफ करीअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंटद्वारे चालवले जातील.अशा प्रकारचे देशातील पहिलेच कोर्स आहेत अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एलएलपीचे संस्थापक हेमंत लवांगरे, गरवारे इन्स्टिट्युटचे संचालिका शिल्पा बोरकर उपस्थित होत्या.
मुंबई विद्यापीठाकडून कौशल्यविकास व रोजगारक्षम अभ्यासक्रमांना चालना देण्याचे धोरण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा समावेश केलेल्या या कोर्समुळे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात करीयर करण्याची संधी निर्माण होणार आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये चालणार्या या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्लेसमेंटची १०० टक्के सुविधा उपलब्ध करून देणार्या या अभ्यासक्रमामुळे म्यॅन्युफॅक्चरिंग, आयटी, रीटेल, कन्सटन्सी, हॉस्पिटॅलिटी, बँकिंग आणि एज्युकेशन क्षेत्रात ह्युमन रिसोर्स, मार्केटिंग, सेल्स, ऑपरेशन्स, प्रोडक्ट मॅनेजमेंट, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन अशा करीअरच्या संधी उपलब्ध होणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी www.gicededu.co या वेबसाइटवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी हे कोर्स सुरू करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्यगुणांना चालना मिळणार असून नेतृत्त्वगुण विकसित केले जाणार आहेत असे संजय देशमुख यांनी सांगितले.