सिनेमागृहांनी वृक्षलागवडीचा संदेश मनामनात पोहोचवावा - सुधीर मुनगंटीवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2017

सिनेमागृहांनी वृक्षलागवडीचा संदेश मनामनात पोहोचवावा - सुधीर मुनगंटीवार


मुंबई दि. १२ : राज्यात दि. १ जुलै ते ७ जुलै २०१७ या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड होणार असून या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक जनतेने सहभागी व्हावे यासाठी सर्व सिनेमागृहांनी वृक्ष लागवडीचा संदेश मनामनात पोहोचवावा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मल्टिप्लेक्स आणि एक पडदा सिनेमागृह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह आयनॉक्स, पीव्हीआर,सिनेमा ओनर असोसिएशनचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

वनमहोत्सवाच्या निमित्ताने राज्यात होणाऱ्या वृक्ष लागवडीचे दृकश्राव्य संदेश विभागाने तयार केले आहेत ते सर्व सिनेमागृह मालकांनी त्यांच्या सिनेमागृहामध्ये विनामूल्य दाखवावेत असे आवाहन वनमंत्र्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की,लोकांच्या मनात वृक्ष लागवडीचे बीजारोपण करण्यासाठी, त्यांच्या मनात वृक्ष लावण्याची इच्छा निर्माण करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यात सिनेमागृह संघटनांनी सहकार्य करावे, हे मनाला समाधान देणारे कार्य आहे.

सिनेमागृहांना ज्या स्वरुपात वृक्ष लागवडीचे संदेश हवे आहेत त्या स्वरुपामध्ये त्यांना हे संदेश देण्यात यावेत अशा सूचना वनमंत्र्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वृक्ष लागवडीचे महत्व आणि त्याची गरज व्यक्त करणारा पाठशालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाला कळविण्यात यावे असेही ते यावेळी म्हणाले.

बैठकीस उपस्थित मल्टिप्लेक्सधारक, एक पडदा सिनेमागृह चालकांनी वन विभागाचे वृक्ष लागवडीचे सर्व संदेश विनामूल्य दाखवण्यात येतील तसेच वृक्ष लागवडीची जनजागृती करतांना वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी होण्यास देखील आवडेल, असे यावेळी सांगितले.

Post Bottom Ad