चौकांचे योग्य डिझाईन केल्यास पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2017

चौकांचे योग्य डिझाईन केल्यास पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते

मुंबईतील ४० चौकांंमध्ये बदल केला जाणार -
मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईतील रस्ते अपघातांत २०१६ मध्ये तब्बल ५६२ जणांचा बळी गेला होता. ज्यामध्ये ५० टक्क्याहून अधिक पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, अपघात होण्याचे सर्वाधिक प्रमाण रस्त्यांच्या चौकांवर (जंक्शन्स) आहे. ही गंभीर बाब असल्याने ‘जंक्शन’वर पादचाऱ्यांचा अपघात टाळण्यासाठी चौकांचे योग्य रितीने आरेखन (डिझाईन) केल्यास वाहतूक कोंडी कमी होते शिवाय पादचाऱ्यांना रस्ता सहज ओलांडतात येऊ शकतो, यामुळे रस्ते अपघातात पादचाऱ्यांचा मृत्यू होण्याची संख्याही कमी केली जाऊ शकते अशी माहिती ‘बीआयजीआरएस’च्या केली लार्सन यांनी मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील रस्ते अधिक सुरक्षित विशेषत: पादचाऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ‘ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ने (बीआयजीआरएस) ‘नॅक्टो-जीडीसीआय आणि ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट’(डब्ल्यूआरआय) या संस्थांच्या व मुंबई महापालिका तसेच मुंबई वाहतूक पोलिस यांच्या मदतीने मालाड येथील मिठ चौकी आणि वांद्रे येथील ‘एचपी जंक्शन’चे पुनर्आरेखन केले आहे. मुंबईतील पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे मोेठे आव्हानात्मक काम असल्याने गेल्या आठवड्यात ‘बीआयजीआरएस’ व अन्य संलग्न संस्थांनी मालाड येथील मिठ चौकी जंक्शनची चाचणी घेतली आणि या प्रयोगासाठी ही सर्वोत्कृष्ट ‘साईट’ असल्याचा अभिप्राय दिला. या ठिकाणी होणारे अपघात आणि त्यातून होणारे मुत्यूंचे व जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी सुमारे १६५० चौरस मीटर जागा मिळवण्यात आली. या जागेचा कमी वापर होत असल्यामुळे त्याचा वापर पादचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी करण्यात आला, असे ‘नॅक्टो’च्या संचालिका स्काई डंकन यांनी सांगितले.

‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्युट’ने मुंबई महापालिका आणि मुंबई वाहतूक पोलिस यांच्यासोबत मुंबईत अधिक धोके असलेल्या चौैकांमध्ये सुरक्षा अधिक वाढवण्यासाठी एप्रिल २०१६ मध्ये सहकार्य करार केला आहे, अशी माहिती ‘डब्ल्यूआरआय’चे वरिष्ठ प्रकल्प सहायक धवल अशर यांनी दिली. वांद्रे येथील एचपी पंप चौकात केलेल्या प्रयोगासाठी बदलाची जबाबदारी ‘बीआयजीआरएस प्रोग्राम’ने घेतली असून, गर्दीच्या वेळी पाच हजारांहून अधिक वाहने आणि तेवढेच पादचारी येथून जात असून, १६ मेपर्यंत हे बदल तसेच ठेवण्यात आले. यानंतर कायमस्वरुपी बदल घडवून या रस्त्यावर दुसऱ्या बाजूचे काम पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार असल्याचे धवल अशर यांनी सांगितले.

४० ठिकाणच्या चौकांंमध्ये बदल करणार - मुंबईतील ‘जंक्शन्स’चा चेहरा मोहरा बदलण्याची सुरुवात वांद्रे आणि मालाड येथे प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली असून, लवकरच सीएसटी, चर्चगेटसह ४० ठिकाणच्या चौकांंमध्येही बदल करण्यात येणार आहेत. वांद्रे टर्नर रोड येथील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर येत्या आॅक्टोबरपासून मुंबईत सीएसटी, चर्चगेट व अन्य ४० ठिकाणी या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आधीच्या दोन प्रयोगांसंबंधी आलेल्या सूचना, शिफारशी,अनुभव यांचा अभ्यास करुन त्याआधारे नव्या ‘जंक्शन्स’मध्ये योग्य ते बदल करण्यात येतील. या नव्या ठिकाणांची नावे पालिकेच्या संकेतस्थळावर लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
संजय दराडे - प्रमुख अभियंता,
रस्ते आणि वाहतूक विभाग, मुंबई महानगरपालिका

Post Bottom Ad