मुंबईत ताप, डेंग्यू, लेप्टो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2017

मुंबईत ताप, डेंग्यू, लेप्टो आणि स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ


मुंबई / प्रतिनिधी -
एकीकडे वाढती गर्मी आणि मधेच पडणारा पाऊस यामुळे मुंबईमधील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांमध्ये आजाराचे प्रमाणही वाढू लागले आहे. मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषकरून मुंबईत स्वाईन फ्लूचे रुग्ण मागील वर्षी पेक्षा मोठ्या संख्येने वाढले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. मुंबईत अद्याप स्वाईन फ्लूने ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत विशेषता पावसाळयात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढलेले असते. मात्र मुंबईत उन्हाळ्यात अचानक पडत असलेला पाऊस यामुळे मे महिन्यात ४४१५ तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात तापाच्या ४१७१ रुग्णांची नोंद झाली होती. लेप्टोस्पायरेसिसचे मे २०१६ मध्ये २ रुग्ण आढळले होते यावर्षी मे महिन्यात लेप्टोस्पायरेसिसचे १० रुग्ण आढळले आहेत. मे २०१६ मध्ये डेंग्यूचे २७ रुग्ण आढळले होते यावर्षी यात वाढ झाली असून मे महिन्यात डेंग्यूचे ३१ रुग्ण आढळले आहेत. मे २०१६ मध्ये स्वाईन फ्लूचा १ रुग्ण आढळला होता यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली असून मे महिन्यात स्वाईन फ्लूचे ५० रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मे २०१६ मध्ये लेप्टोस्पायरेसिसचे २७ संशयित रुग्ण आढळले होते त्यात वाढ होऊन यावर्षी मे महिन्यात लेप्टोस्पायरेसिसच्या ६६ संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर मे २०१६ मध्ये डेंग्यूचे १२९ संशयित रुग्ण होते त्यात यावर्षी वाढ होऊन मे महिन्यात डेंग्यूच्या १५४ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत मे महिन्यात ताप, लेप्टोस्पायरेसिस व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असताना ग्यास्ट्रो, हेपेटायसिसच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मे २०१६ मध्ये ग्यास्ट्रोचे ९२० रुग्णांची नोंद झाली होती ही संख्या यावर्षी कमी झाली आहे. मे महिन्यात ग्यास्ट्रोच्या ८४७ रुग्णांची नोंद झाली आहे. मे २०१६ मध्ये हेपेटायसिसच्या १३५ रुग्णांची नोंद झाली होती यात यावर्षी घाट होऊन यावर्षी मे महिन्यात हेपेटायसिसच्या १०६ रुग्णांची नोंद झाली आहे. मे २०१६ मध्ये कॉलराचे २ रूगन आढळले होते या वर्षी कॉलराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच मागील वर्षी व या वर्षी मे महिन्यात चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही असे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेली हि आकडेवारी फक्त महापालिकेच्या रुग्णालयात नोंद झालेल्या रुग्णांची आहे. इतर खाजगी रुग्णालये व दवाखान्यात या आजारांचे रुग्ण किती याची आकडेवारी या अहवालात नोंद नाही. यामुळे मुंबईत विविध आजारांच्या रुग्णांची संख्या यापेक्षा मोठी असल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

आजार                        मे २०१६      मे २०१७ 
ताप                             ४१७१           ४४१५
मलेरिया                         ४२३             ३३१
लेप्टोस्पायरेसिस                 २               १०
डेंग्यू                                २७               ३१
स्वाईन फ्लू                         १               ५०
ग्यास्ट्रो                           ९२०            ८४७
हेपेटायसिस                     १३५            १०६
चिकनगुनिया                     ०                ०
कॉलरा                              २                 ०

Post Bottom Ad