मुंबई - महिला गटाचे विविध प्रश्न, केरूशेठ चौगुले चाळ, धारावी येथील रहिवासी शौचालय, आरे दूध केंद्रावर होत असलेली निष्कासनाची कारवाई, अशा विविध समस्यांबाबत बुधवारी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची महानगरपालिका मुख्यालयात भेट घेतली.
ज्या आरे दूध केंद्र चालकांकडे परवाना नाही, त्याचे केंद्र अनधिकृत समजून मनपा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आरे केंद्रावर निष्कासनाची कारवाई करत आहे. राज्य शासनाने दूधपुरवठय़ाअभावी मनपाला पूर्वकल्पना न देता आरे केंद्रांवर इतर खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी दिली. याबाबत महानगरपालिका आणि राज्य शासन यांच्यात ताळमेळच्या अभावामुळेच महानगरपालिका उघड्यावर खाद्यपदार्थ विकणार्या आरे केंद्रांवर निष्कासनाची कारवाई करत आहे. हे अयोग्य असून राज्य शासन आणि मनपा यांच्यात जोपर्यंत ताळमेळ होत नाही तोपर्यंत या कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी अजोय मेहता यांच्याकडे केली.
तसेच मनपातर्फे वार्ड पातळीवर 'स्वच्छ भारत' अभियान अंतर्गत 'दत्तक वस्ती' व 'स्वच्छ मुंबई सामाजिक प्रबोधन' योजनेअंतर्गत भाग घेण्यासाठी महापालिकेच्या काही वॉर्डांत बचत गटांकडून योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जासोबत विनापरतावा ११६0 रुपये शुल्क आकारते, तर काही वॉर्डांत ही अनामत रक्कम आकारली जात नाही. यावरून पालिकेच्याच वॉर्डमध्ये योजनेची प्रक्रिया कशी राबवावी, याबद्दल सुस्पष्टता दिसत नाही, तसेच जर कंत्राट मिळाल्यानंतर बचत गटांकडून २0 टक्के अनामत रक्कम आकारली जाते, तर मग प्रवेशशुल्क का आकारावे, अशी खंत शालिनी ठाकरे यांनी आयुक्तांसमोर व्यक्त केली.