मुंबई (प्रतिनिधी) - मुलुंड येथील झाडांची कत्तल करण्यास गुरुवारी सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला. यावेळी सेना- भाजपमध्ये शाब्दीक खडाजंगी झाली. प्रशासनानेही भाजपच्या बाजूने संमती दर्शवल्याने शिवसेनेने प्रशासन व भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यानंतर पत्रकार परिषद घेवून भाजपच्या पारदर्शक कारभारावर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी जोरदार टिका केली. वृक्षतोडबाबत भाजप दुटप्पी भूमिका मांडत असून ते पहारेकरी नाही तर पर्यावरणाचे मारेकरी असल्याचा घणाघाती आरोप केला. तसेच याविरोधात पालिका आयुक्त व पर्यावरण मंत्र्यांकडे प्रस्तावाबाबत फेर-विचार करण्याबाबत पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुवारी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मुलुंड येथील चिंधी बाजार रोडच्या विकासकामांत येणारी 93 झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी आला होता. याप्रस्तावाला शिवसेनेने विरोध करुन झाडे तोडण्याबाबत हरकत घेतली. दरम्यान, 9 झाडे कापली जाणार असून 83 झाडे पुनर्रोपित करणार असल्याचे निवेदन पालिका आयुक्तांनी वाचून दाखवले. मात्र, झाडे तोडू नये याबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सेना- भाजपमध्ये खडाजंगी झाली. यावेळी स्थायी समितीत आलेल्या शालेय मुलांकरिता लाकडी बाके देण्याच्या प्रस्तावाची भाजपला आठवण करुन देण्यात आली. मुलांना लाकडी बाके देण्यासाठी झाडे तोडल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, अशी भूमिका त्यावेळी भाजपने मांडली होती. त्यामुळे मुलुंडमधील झाडांची छाटणी करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही का, असा प्रश्न त्यांनी सभागृहनेत्यांनी विचारला. तसेच झाडे तोडण्याबाबत भाजप दुटप्पी भूमिका घेत असून याबाबत मिलीभगत झाल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला.
सत्ताधारी शिवसेनेवर नामुश्की -झाडे कापणीबाबतच्या जीआर नुसार आयुक्तांनी निवेदन केले. त्याला शिवसेनेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी भाजप वगळता विरोधीपक्षाच्या सदस्यांनी पाठींबा दिला. मात्र शिवसेनेचे जास्त सदस्य असतानाही मतदानाची मागणी न करता सभात्याग करण्याचा निर्णय सत्ता्धारी शिवसेनेला घ्यावा लागला. मात्र भाजपने याची संधी साधून सभा सुरू ठेवत सदर प्रस्ताव मंजूर घेतला. यामुळे शिवसेनेवर सभात्यागाची नामुश्की ओढवली.